
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चास गावातील अटकमळा येथील बंद घराचे कुलूप तोडून दरवाजा उचकटून घरातील वापराच्या वस्तू व चांदीचे देव अज्ञात चोरट्याने चोरून नेले असून याबाबतची तक्रार सुयश दिगंबर मानकर दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – घोडेगाव
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी हे कामानिम्मीत्त कुटुंबासह मुंबई राहण्यास आहेत, परंतु त्यांचे चास या गावी घर आहे, सदर गावाकडील घर शक्यतो बंद असते फिर्यादी कुटुंबासह शेतीच्याकामानिमित्त गावी येवुन जावुन करत असतात.

मात्र दि 07/07/2025 रोजी सकाळी 09/30 वा फिर्यादी यांचे चुलते सुरेश बबन माणकर यांनी फिर्यादी यांना फोन करून कळविले की तुमच्या घराचे कुलूप तुटलेले आहे. मी काल रात्री दि.06/07/2025 रोजी रात्री 09/00 वा पाहीले तेंव्हा घराला कुलुप सुस्थितीत होते, तरी तुम्ही येवुन खात्री करा म्हणुन फिर्यादी व कुटुंबाने येवुन पाहीले असता अटकमळा चास ता. आंबेगाव जि.पुणे येथील रानातील घराचे कोणीतरी अज्ञात इसमाने कशाच्यातरी साहाय्याने कुलुप तोडुन दरवाजा उघडुन त्यावाटे आत प्रवेश करुन कशाने तरी कपाट तोडुन नुकसान केले असल्याचे दिसले.

घरफोडी करून घरातील वस्तू चोरी करुन नेल्या असून त्यामध्ये एक तांब्याचा बंब पाणी तापवण्याचा, पितळी पातेले (टोप) ते एकुन पाच, एक पितळी पिंप (टाकी), घरातील तांब्याची भांडी एक घरंगाळ, सहा तांबे, एक ताम्हण, चार पराती, त्याच बरोबर कपाटात ठेवलेला चांदीचा गणपतीचा मुकुट व मोदक असा एकूण अंदाजे 41,000/- चोरीस गेला असून, फिर्यादीचे नुकसान केले आहे सदर फिर्यादी मानकर यांनी सदर अज्ञात इसमाविरुद्ध घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठ्ठल वाघ हे करत आहेत.

दरम्यान आंबेगाव तालुक्यातील काही गावांमधील वाडी वस्तीवरील बंद घरे व वयोवृद्ध राहणाऱ्या व्यक्तींची घरे चोरट्यांकडून टारगेट होत आहे, लवकरच आम्ही चोरट्यांचा शोध घेऊ. मात्र आप आपल्या गावांमध्ये वाडी वस्तीवर कोणी अपरिचित व्यक्ती दिसून आल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधावा. तसेच आपल्या घरातील मौल्यवान वस्तू, पैसे हे बँकांमध्ये ठेवण्यात यावे. तसेच आवश्यक व गरजेच्या वस्तूच घरामध्ये ठेवण्यात याव्यात असे आव्हान घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सागर पवार यांनी केले आहे.