
दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन, पुणे व कॉसमॉस सहकारी बँक, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल “ग्रीन वर्ल्ड को प्राईड २०२५” पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान करण्यात आला असून कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील व कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी स्विकारला.
प्रतिनिधी – दीपाली खिरड
ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन, पुणे व कॉसमॉस सहकारी बँक, पुणे यांनी संयुक्त विद्यमाने जागतिक सहकार वर्षाचे औचित्य साधून सहकार व्यवस्थेतील अनुभवांचे आदानप्रदान, विचारमंथन व धोरणात्मक संकल्पनावर चर्चा करण्यासाठी “सहकार मंथन २०२५” कार्यक्रम रविवार (दि. २१ डिसेंबर) आयोजित करून कार्यक्रमामध्ये कारखान्यास “ग्रीन वर्ल्ड को प्राईड २०२५” पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक डॉ. विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त संजय कोलते, कॉसमॉस सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे, ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनचे चेअरमन गौतम कोतवाल तसेच साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील पुरस्काराबाबत माहिती देताना म्हणाले, सभासद, ऊस उत्पादक शेतक-यांच्या हिताचे रक्षण करून ऊसास दिलेला यथोचित दर, उत्पादन खर्चातील सुव्यवस्था, व्यवस्थापनातील पारदर्शकता, कारखान्याच्या व्यापक विकासासाठी इथेनॉल प्रकल्प, को-जन प्रकल्प, प्रेसमड व बायो-फर्टिलायझर उत्पादन, कचरा व्यवस्थापनाचा योग्य मेळ घालून शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ, स्थानिक अर्थव्यवस्था मजबुती व ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीस मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे व्यवस्थापनाच्या गुणांचा अभ्यास करून सहकार मुल्यांवर आधारित प्रगत, पारदर्शक आणि समाजाभिमुख कामगिरीचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदर पुरस्कार प्राप्त होणेस कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे.
आजपर्यंत कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १७ असे एकूण ३० पुरस्कार प्राप्त झालेले असल्याची माहिती कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी दिली.


