
मंचर – प्रतिनिधी
कोणतीही शासकीय किंवा पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या मनोरंजनाचा ‘पाळणा’ व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी मंचर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुरुषोत्तम संजय कुंभार (रा. कुंभारवाडा, संजयनगर रोड, ता. जि. नंदुरबार) असे गुन्हा दाखल झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. हा सर्व प्रकार मंचर हद्दीतील मुळेवाडी चौकाच्या बाजूला असलेल्या अवनीश मेडिकलच्या पाठीमागे, बाणखेले यांच्या सामाईक मोकळ्या जागेत सुरू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल पवार, पोलीस हवालदार एस. एन. नाडेकर आणि पोलीस अंमलदार योगेश रोडे हे शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी फोनद्वारे माहिती दिली की, मुळेवाडी चौकाजवळील अवनीश मेडिकलच्या पाठीमागे बाणखेले यांच्या सामाईक मोकळ्या जागेत कोणीतरी विनापरवाना पाळणा लावून लोकांच्या मनोरंजनाचा व्यवसाय सुरू केला आहे.

पोलिसांच्या पथकाने तात्काळ सदर मोकळ्या जागेत जाऊन खात्री केली असता, तेथे पाळणा सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चौकशी केली असता पुरुषोत्तम कुंभार याने आपण या पाळणा व्यवसायाचा मॅनेजर असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याच्याकडे आवश्यक शासकीय कार्यालयांच्या व पोलिसांच्या परवानगीची कागदपत्रे मागितली असता, त्याच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे उघड झाले. दि. ३ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बाणखेले यांच्या या सामाईक जागेत हा व्यवसाय बेकायदेशीररीत्या सुरू होता.
याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (w) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अलका किरवे या करत आहेत.
सणासुदीच्या काळात गावागावांत आणि शहरांत मोकळ्या जागांवर जत्रा, मनोरंजनाचे पाळणे आणि विविध खेळणी लावली जातात. मात्र, असे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी संबंधितांनी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि इतर विभागांची रीतसर परवानगी घेणे व सुरक्षेची प्रमाणपत्रे सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच, मोकळ्या जागांच्या मालकांनीही आपली जागा भाड्याने किंवा वापरण्यास देताना संबंधित व्यावसायिकाकडे सर्व शासकीय परवानग्या आहेत की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे. विनापरवाना चालवल्या जाणाऱ्या अशा पाळण्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी नसते, विनापरवाना व्यवसायामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास व्यावसायिकासोबतच जागामालकही कायदेशीर अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे जागामालकांनी लेखी करार व कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय जागा देऊ नये. ज्यामुळे नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनीही अशा ठिकाणी जाताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि कोणताही अनधिकृत प्रकार आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

