
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु. (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामातील अंतिम हप्त्याची रक्कम सोमवार (२६ ऑक्टोबर) रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. गाळप केलेल्या ८,८३,०६९ मे. टन ऊसास प्रति मे. टन १७७ रुपयांप्रमाणे एकूण १५ कोटी ६३ लाख ३ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – दत्तात्रयनगर पारगाव
कारखान्याचे संस्थापक-संचालक व राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने गाळप हंगाम २०२५-२६ मधील ऊसासाठी ३,५०० रुपये प्रति मे.टन असा अंतिम ऊस दर जाहीर केला होता. यापूर्वी अदा केलेला दर वजा करून उर्वरित देय रक्कम १७७ रुपये प्रति मे. टनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी अंतिम हप्त्याची रक्कम वर्ग करून कारखान्याने जाहीर केल्याप्रमाणे आपला शब्द पूर्ण केला आहे, असे चेअरमन बेंडे यांनी सांगितले.
भीमाशंकर कारखान्याने एफ.आर.पी. (FRP) ची रक्कम नेहमीच वेळेत देण्याची परंपरा जपली आहे. याशिवाय वाढीव रक्कम अंतिम हप्त्याच्या स्वरूपात मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. कारखान्याने आजवर सभासद, बिगर सभासद व गेटकेन असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान ऊस दर देण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे.
नवीन हंगामाचे नियोजन पूर्ण: प्रदीप वळसे पाटील
दरम्यान, चालू गाळप हंगाम २०२६-२७ मधील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याचे पूर्ण नियोजन कारखान्याने केले आहे. त्यासाठी ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणा कार्यक्षेत्रात दाखल झाली असून कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे. कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला संपूर्ण ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे.

