
प्रतिनिधी – विश्वजित गवारी
आधी पतसंस्थेत जायचं, गोड बोलून बनावट कागदपत्रांच्या आधारे खातं उघडायचं, विश्वास संपादन करायचा अन् काही दिवसांतच बनावट सोनं गहाण ठेवून लाखो रुपये घेऊन पसार व्हायचं ! अशाच एका हायटेक भामट्याने आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील एका पतसंस्थेला तब्बल ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात सचिन राधाकिसन मोरे नावाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
विश्वास जिंकला, दोन टप्प्यांत लाखो रुपये लांबवले!
मिळालेल्या माहितीनुसार, श्री अंबिका ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या महाळुंगे पडवळ शाखेत जून २०२६ मध्ये सचिन मोरे हा इसम कागदपत्रे घेऊन आला. खाते उघडून सभासद बनल्यानंतर त्याने अत्यंत हुशारीने पहिल्याच दिवशी (८ जून) ३८ ग्रॅम ६०० मिली सोने तारण ठेवत ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. पतसंस्थेचा विश्वास बसल्याचे पाहून अवघ्या ८ दिवसांत, म्हणजेच १६ जून रोजी त्याने पुन्हा ७६ ग्रॅम ९०० मिली सोने आणले आणि त्या बदल्यात ६ लाख २७ हजार रुपयांचे दुसरे मोठे कर्ज उचलले.
७७ टक्के चांदीवर सोन्याचा मुलामा ! असा फुटला भांडा:
काही दिवसांनंतर पतसंस्थेचे अधिकृत सोनार यांना या सोन्याच्या शुद्धतेबाबत शंका आली. त्यांनी तात्काळ व्यवस्थापनाला याची माहिती दिली. पतसंस्थेने अंतर्गत चौकशी समिती नेमून जेव्हा त्या सोन्याची पुन्हा कसून तपासणी (Re-valuation) केली, तेव्हा पतसंस्थेचे अधिकारीही चक्रावून गेले. ज्याला सोनं समजून लाखो रुपये दिले होते, त्यामध्ये अवघे २२.५७ टक्के सोने आणि तब्बल ७७.२६ टक्के चांदी आढळली! म्हणजेच आरोपीने चांदीवर सोन्याचा मुलामा देऊन पतसंस्थेला गंडा घातला होता.

तपासात पत्ता निघाला गायब, कागदपत्रेही बोगस!
फसवणूक झाल्याचे समजताच पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिवराम गायकर व कर्मचाऱ्यांनी आरोपीने दिलेल्या नांदूर ता. आंबेगाव येथील पत्त्यावर जाऊन पहिले. मात्र, तिथे गेल्यावर समजले की या नावाचा कोणताही व्यक्ती गावात राहतच नाही! आरोपीने खातं उघडताना दिलेली आधार-पॅन कार्ड व केवायसी (KYC) कागदपत्रेही पूर्णपणे बोगस आणि बनावट असल्याचे उघड झाले.
मंचर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४) नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार मांडवे पुढील तपास करत आहेत.
व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी 👇🏻👇 येथे क्लिक करा.

