
आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांमध्ये घोड शाखेला पाणी मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके करपण्याच्या मार्गावर असून, विहिरींची पाणीपातळीही कमालीची घटली आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत असून, जनावरांसाठी ओला चारा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे घोड शाखेला प्रशासनाने तातडीने पाणी सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुका ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष आणि स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.
प्रतिनिधी- अनिल चिखले
२५ गावांमध्ये पिकांची परवड
डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील आंबेगाव तालुक्यातील सुमारे २५ गावांमध्ये खरीप हंगामातील पिकांची पाण्याअभावी मोठी परवड झाली आहे. महाळुंगे पडवळ, साकोरे, कळंब, थोरांदळे, लौकी आणि जाधववाडी परिसरातील शेतकऱ्यांनी कालव्यातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे आधीच अडचणीत आलेल्या बळीराजाला आता सिंचनासाठी पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
जलस्रोत आटले; शेतकरी हवालदिल
महाळुंगे पडवळ-साकोरे परिसरातील शेती प्रामुख्याने विहिरी, ओढे आणि ओहोळांमधील पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा पावसाअभावी विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट झाली असून, घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या (K.T. Weir) बंधाऱ्यांमध्येही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. उपलब्ध पाण्याचे पारंपरिक स्रोत आटत चालल्याने आता हाता तोंडाशी आलेली उभी पिके जगवायची कशी, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
खरीप पिकांचे नुकसान; आर्थिक गणित कोलमडले
खरीप हंगामात पेरणी आणि पिकांच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवर हजारो रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, मोक्याच्या नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळत नाही. वेळेत पाणी उपलब्ध झाले नाही, तर उभी पिके डोळ्यांदेखत जळून खाक होतील आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
पशुधन धोक्यात; चाऱ्याची टंचाई
शेतीबरोबरच आता ग्रामीण भागातील मुख्य आधार असलेल्या पशुधनाचा चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पिके वाळू लागल्याने जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होणे कठीण झाले आहे. दुभत्या जनावरांना जगवायचे कसे,या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे. प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
कालवा समितीच्या बैठकीकडे लक्ष
शेतकऱ्यांचे वाढते संकट पाहता, प्रशासनाने विशेष परवानगी घेऊन किंवा तातडीने पावले उचलून कालव्याला पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, याकडे आता संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
“पावसाअभावी शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. पिके वाचवण्यासाठी डिंभे डाव्या कालव्यातून घोड शाखेला पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे. काही कारण पुढे करून जर पाणी नाकारले, तर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल.”
— अध्यक्ष, तालुका ऊस उत्पादक संघ व शेतकरी.

