
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, श्रमप्रतिष्ठा, स्वच्छता, स्वावलंबन आणि समतेची मूल्ये रुजविण्यासाठी साने गुरुजी कथामालेतर्फे शाळांमध्ये कथाकथनाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. फुले दांपत्याचे महिला व वंचितांच्या शिक्षणासाठीचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे संस्कार करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हाच पुरोगामी विचारवारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढेही विविध उपक्रम राबविले जातील, असा विश्वास अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे माजी अध्यक्ष शामराव कराळे यांनी व्यक्त केला.
प्रतिनिधी – अनिल चिखले
येथील पुणे मॉडेल स्कूलमध्ये आयोजित कथाकथन आणि गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. विद्यार्थ्यांनी साने गुरुजींचे विचार केवळ ऐकू नयेत, तर ते आपल्या आचरणात आणून यश संपादन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता, साने गुरुजी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आधार ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पडवळ होते. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे, केंद्रप्रमुख स्मिता चासकर, मुख्याध्यापिका सुनंदा टेके यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२७ गुणवंतांना सन्मानचिन्ह व पुस्तिकांचे वाटप
या सोहळ्यात इयत्ता पहिली ते चौथीच्या विविध स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या २७ गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी माजी केंद्रप्रमुख शिवाजी पडवळ यांच्या वतीने १७२ विद्यार्थ्यांना कला-कृती व कार्यानुभवाच्या पुस्तिका भेट देण्यात आल्या. तसेच, पालघर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड झाल्याबद्दल शाळेच्या संगणक शिक्षिका श्रद्धा डोके यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आत्माराम जगदाळे यांनी, तर उपस्थितांचे आभार संजयकुमार पडवळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पुणे मॉडेल स्कूलचे शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

