
प्रतिनिधी – दिपालीताई खिरड
आंबेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र वडगाव काशिंबे येथे दीपावली पाडव्यानिमित्त तब्बल ५५५ दिव्यांची नेत्रदीपक आरास करून दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, यावर्षी प्रज्वलित केलेल्या दिव्यांच्या माध्यमातून ‘जय श्रीराम’ हे नाव साकारण्यात आले होते. दिव्यांचा हा लखलखाट आणि भक्तिमय वातावरण अनुभवण्यासाठी ग्रामस्थांनी मंदिरात गर्दी केली होती.

श्रीराम देवस्थानचे पुजारी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुण आणि महिला वर्गाने एकत्र येत या उपक्रमाचे आयोजन केले होते. वडगाव काशिंबे येथे गेल्या चार वर्षांपासून हा दीपोत्सवाचा उपक्रम अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात राबवला जात आहे. सामाजिक एकोपा आणि धार्मिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने गावातील तरुण व महिला दरवर्षी या उत्सवासाठी पुढाकार घेतात.

मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यानंतर श्रीराम प्रभूंच्या मंदिरात या मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. तरुण मुले आणि महिलांनी एकत्र येऊन ५५५ पणत्या प्रज्वलित केल्या आणि त्यातून अत्यंत सुबक पद्धतीने ‘जय श्रीराम’ हे नाव रेखाटले. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्रीराम प्रभूंची महाआरती संपन्न झाली. संपूर्ण मंदिर परिसर भारावून गेला होता.

महाआरती व दीपोत्सवाच्या या मंगलमय सोहळ्यानंतर श्रीराम प्रभूंच्या मंदिराबाहेर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आकाशात उडणाऱ्या रंगीबेरंगी फटाक्यांनी आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने ग्रामस्थांनी आपला आनंद व्यक्त केला. या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.


