जाहिरात
WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

अवकाळी पावसासह गारपिटीने पशुधनांस शेतीमालांचेही नुकसान, शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त; डोळ्यात अश्रू

लोणी (वाळुंजनगर) आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी लोणी जवळील वाळुंजनगर परिसरात झालेल्या भीषण अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठा कहर केला. अवघ्या १५ ते २० मिनिटांत झालेल्या सुपारीएवढ्या गारांच्या माऱ्यामुळे सात मेंढ्या आणि सहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ५० हून अधिक पशुधन गंभीर जखमी झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे उभ्या शेती पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांचा उदरनिर्वाहाचा आधारच हिरावला गेला आहे.

प्रतिनिधी – दिपाली खिरड

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी ताराचंद वाळुंज आणि पंढरीनाथ आदक यांचा सुमारे अडीचशे मेंढ्या व शेळ्यांचा कळप शेतात विसावलेला होता. सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस व गारा पडू लागल्या. निसर्गाच्या या अचानक कोपामुळे मूक प्राण्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. डोळ्यादेखत आपले पशुधन मृत्युमुखी पडताना पाहून दोन्ही शेतकरी पूर्णपणे खचले आहेत.

मोठे आर्थिक संकट
या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे दीड लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. ज्या पशुधनावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता, तेच गेल्याने या कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. आधीच शेती अडचणीत असताना निसर्गाने हा घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बाधित शेतकऱ्यांना धीर दिला. मात्र, आता सर्वांचे लक्ष प्रशासनाकडे लागले आहे. महसूल विभागाने तातडीने या घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान किंवा आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

डॉ. सचिन वाघ – तहसीलदार आंबेगाव

देवगाव, पोंडेवाडी आणि वाळुंजनगर तसेच ज्या ज्या ठिकाणी पाऊस व गारपीट झाली त्या ठिकाणी तलाठी/ग्राम महसूल अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली असून पंचनाम्याचे काम वेगाने सुरू आहे. हे पंचनामे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले जातील, तर वादळी वारे आणि पावसापासून नागरिकांनी स्वत:चे व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षित ठिकाणी राहावे, तसेच पाळीव प्राण्यांचेही सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. जर काही नुकसान झाले असेल, तर तातडीने स्थानिक प्रशासनाला कळवावे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!