
आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी (खालचामळा) येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन मित्रांना लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये एका तरुणाचा उजवा हात कोपरात फ्रॅक्चर झाला असून दुसऱ्याच्या तोंडावर गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिनिधी – विश्वजित गवारी
जुन्या वादातून झाली शिवीगाळ
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज बाळू जाधव (वय २७, रा. जाधववाडी, रांजणी) आणि त्यांचा मित्र निरंजन शशिकांत जाधव हे २२ जून २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जाधववाडी येथील निरंजनच्या घरासमोर उभे होते. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून अनुप नामदेव मुळे आणि सोन्या मुळे (पूर्ण नाव माहीत नाही, दोन्ही रा. मांजरवाडी, ता. जुन्नर) हे त्या ठिकाणी आले. “तुम्ही आमचे मिलिंद जाधव याच्यासोबत ३ वर्षांपूर्वी झालेले भांडण सांगणारे कोण?” असे म्हणून त्यांनी सुरज आणि निरंजन यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
लाकडी दांडक्याने केला हल्ला
हा वाद सुरू असतानाच त्या ठिकाणी मिलिंद शरद जाधव आणि महेश राजाराम जाधव (दोन्ही रा. जाधववाडी, ता. आंबेगाव) हे देखील आले. त्यांनी सुरज आणि निरंजन यांना दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मिलिंद जाधव याने हातातील लाकडी दांडक्याने सुरज यांच्या उजव्या हातावर जोरात वार केला. तर अनुप मुळे याने निरंजन जाधव याच्या तोंडावर हाताने बेदम मारहाण केली. हा वाद सुरू असताना शशिकांत जाधव आणि योगेश जाधव यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले. यानंतर सर्व आरोपी तेथून पळून गेले
वैद्यकीय तपासणीत फ्रॅक्चर उघड
घटनेनंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २३ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जखमी सुरज जाधव आणि निरंजन जाधव हे मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता, लाकडी दांडक्याच्या प्रहारामुळे सुरज जाधव यांचा उजवा हात कोपरात फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले.
चार जणांवर गुन्हा दाखल
उपचार घेतल्यानंतर सुरज जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी अनुप नामदेव मुळे, सोन्या मुळे, मिलिंद शरद जाधव आणि महेश राजाराम जाधव या चार जणांविरुद्ध बेकायदेशीर कृत्य, गंभीर दुखापत आणि दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण उंडे करत आहेत.


