
तू कोर्टात केसच्या तारखेला का येत होतास ? असे म्हणून जुन्या वादाचा राग मनात धरून दारूच्या नशेत एका तरुणाला शिवीगाळ करत डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील मौजे जाधववाडी येथे घडली आहे. या मारहाणीत तरुणाला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या आईलाही आरोपींनी धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलींद शरद जाधव (रा. जाधववाडी, ता. आंबेगाव) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी सुरज बाळु जाधव आणि निरंजन शशीकांत जाधव (दोघे रा. जाधववाडी, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिनिधी – विश्वजित गवारी
घटनेचा सविस्तर तपशील
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, फिर्यादी मिलींद जाधव हे २२ जून २०२६ रोजी गावात एका लग्नासाठी गेले होते. सायंकाळी ५:३० च्या सुमारास ते लग्नावरून घरी परतले असता, आरोपी सुरज जाधव आणि निरंजन जाधव हे दोघे दारू पिऊन त्यांच्यासमोर आले. “तू कोर्टात केसच्या तारखेला का येत होतास?” असे विचारत त्यांनी फिर्यादी मिलींद जाधव यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी निरंजन जाधव याने फिर्यादी मिलींद जाधव यांच्या उजव्या हाताचे बोट पिरगळले, तर आरोपी सुरज जाधवने दगड घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. वाद टाळण्यासाठी फिर्यादी मिलींद जाधव तेथून निघून घरी आले व झोपले.

तरिही आरोपींचा राग शांत झाला नव्हता. अर्ध्या तासानंतर आरोपी दोघांनी फिर्यादी मिलींद जाधव यांच्या घराची बेल वाजवली. फिर्यादी यांच्या आई यांनी दरवाजा उघडला असता आरोपींनी त्यांना देखील धक्काबुक्की केली. या आवाजामुळे फिर्यादी मिलींद जाधव हे बाहेर ओट्यावर आले असता आरोपी सुरज जाधव याने तेथील दगड फिर्यादी यांच्या डोक्यात दोन्ही बाजूंना मारून त्यांना रक्तबंबाळ केले. तसेच आरोपी निरंजन जाधव याने फिर्यादी यांचे आईला हाताने ढकलून दिले व हातात लोखंडी रॉड घेऊन “जर पोलिसांत तक्रार दिली तर तुम्हाला जीवे सोडणार नाही,” अशी धमकी देऊन आरोपी तेथून पळून गेले.
पोलीस कारवाई
रक्तबंबाळ झालेल्या फिर्यादी मिलींद जाधव यांना पोलिसांनी उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे पाठवले. उपचार घेतल्यानंतर फिर्यादी मिलींद जाधव यांनी दिलेल्या जबाबानुसार मंचर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार लक्ष्मण तुकाराम उंडे करत आहेत.

