1782234614371

सर्वसामान्यांचा रस्ता रोखणाऱ्यांची खैर नाही ! तहसीलदार डॉ. सचिन वाघ आणि पोलिसांची तांबडेमळ्यात धडक कारवाई.

आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथील चिमणवाडीकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक बंद केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. रविवार, दिनांक १७ रोजी घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या दोन दिवसांत म्हणजेच मंगळवारी दुपारी हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

स्वराज्य संवाद – ज्ञानेश्वर खिरड

दळणवळण ठप्प झाल्याने नागरिक होते अडचणीत
चिमणवाडीकडे जाणारा हा रस्ता स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मुख्य मार्गच अचानक बंद करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांची दैनंदिन वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात ने-आण करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता, तसेच शाळकरी मुले, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांची ये-जा पूर्णपणे थांबली होती. या गंभीर समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.

माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून तातडीने दखल
रस्ता बंद झाल्याने निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीची माहिती ग्रामस्थांनी मंगळवार, दिनांक १९ रोजी आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वळसे पाटील यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली. त्यांनी तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आणि रस्ता तातडीने पूर्ववत करण्याचे आदेश दिले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव आणि धडक कारवाई
दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनंतर आंबेगावचे तहसीलदार तथा दंडाधिकारी डॉ. सचिन वाघ, पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे, तसेच पोलीस कर्मचारी तुषार अर्जुन यांनी तातडीने तांबडेमळा येथील घटनास्थळी भेट दिली. प्रशासनाने संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि बेकायदेशीरपणे रस्ता बंद करणाऱ्यांवर धडक कारवाईचे संकेत दिले. त्यानंतर मंगळवारी दुपारी प्रशासकीय बळाचा वापर करून बंद करण्यात आलेला रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला.

ग्रामस्थांकडून लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार
रस्ता पुन्हा पूर्ववत सुरू झाल्यामुळे तांबडेमळा आणि चिमणवाडी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. प्रशासनाच्या या तत्पर आणि वेगवान कारवाईबद्दल, तसेच माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पंचायत समिती सदस्य शिवाजीराव निघोट यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल ग्रामस्थांनी जाहीर आभार मानले आहेत. आदर्श गाव तांबडेमळा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच प्राजक्ता तांबडे यांच्या वतीनेही प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि सर्व संबंधितांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
  1. साहेबांनी आदेश दिला अधिकारी पळत सुटतात मग सामान्य लोकांसाठी का पळत नाहीत .पाच पाच वर्षाच्या रस्त्यांच्या केसेस पेंडिंग आहेत .शासन निर्णय घेतय पण प्रशासन निर्णय घेत नाही .स्थानिक प्रशासनावर स्थानिक लोकप्रतिनिधींचे वर्चस्व असते .काही विशिष्ट प्रश्न सोडवायचे काही सोडवायचे नाहीत असे साहेबांचेच आदेश अधिकाऱ्यांना आहेत का काय असेच वाटते .
    मी एक वर्ष झाले माझा वापराचा रस्ता अडवले म्हणून मामलदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5 नुसार दावा केलेला आहे त्याला एक वर्ष पूर्ण झाले .एक वर्षात मला 6 वेळा स्थळ पाहणी साठी नोटीस दिले परतू तहसीलदार साहेब आलेच नाहीत .ज्यांनी रस्ता अडवला आहे ते साहेबांचे कार्यकर्ते आहेत म्हणून तहसीलदार साहेब येत नाही हे आज यावरून स्पष्ट होतंय.म्हणजे अधिकारी आमदारांसाठीच काम करतात सामान्य लोकांसाठी नाही .आणि आमदार साहेब त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी काम मार्गी लावतात .म्हणजे साहेबाना फक्त कार्यकर्ता महत्वाचा आहे सामान्य माणूस मतदार नाही . साहेब फक्त कार्यकर्त्यांच्याच मतावर निवडून आलेत का हा एक प्रश्न आणि दुसरा म्हणजे
    अधिकारी सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आहेत की साहेबांची सेवा करण्यासाठी .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments