जाहिरात गवारी

अवसरी खुर्द (भोरमळा) येथील डिंभा कालव्याजवळील ओढ्याला संरक्षक कठडा नाही ; मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता, नागरिक भयभीत

 प्रतिनिधी : किसन टाव्हरे

अवसरी खुर्द (भोरमळा) परिसरातील डिंभा उजवा कालव्याला लागून असलेल्या मुख्य ओढ्याच्या कडेला सुरक्षारक्षक भिंत किंवा संरक्षक कठडा नसल्याने स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या धोकादायक मार्गावरून दररोज शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, दूध व्यावसायिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र, ओढ्याच्या कडेला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे येथे केव्हाही मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

धोक्याचे वळण आणि अपघातांचे सत्र

या रस्त्यावरून प्रवास करताना ओढ्याजवळ एक तीव्र वळण आहे. डिंभा कालव्याच्या समांतर वाहणाऱ्या या ओढ्याची खोली जास्त असल्याने एखादे वाहन घसरल्यास थेट खाली कोसळण्याचा धोका आहे. स्थानिक शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात नेण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. रात्रीच्या वेळी या परिसरात पुरेसे दिवे नसल्यामुळे संपूर्ण रस्ता अंधारात असतो. त्यातच पावसाळ्याच्या दिवसांत रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी चालकांचा अंदाज चुकतो आणि वाहने घसरतात. यापूर्वीही या ठिकाणी अनेक किरकोळ अपघात झाले असून, वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची किंवा बळी जाण्याची वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

अंधाराच्या वेळी किंवा पावसाळ्यात बाहेरील गावाहून येणाऱ्या नवीन वाहन चालकांना या ओढ्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी या ठिकाणी तातडीने निधी मंजूर करून सिमेंटची पक्की सुरक्षारक्षक भिंत उभारावी, तसेच तात्पुरती उपाययोजना म्हणून धोकादायक वळणावर धोकादायक वळणकिंवा पुढे ओढा आहेअसे फलक लावावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

रात्रीचा प्रवास ठरतोय जीवघेणा !

“भोरमळा परिसरातील हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आणि रहदारीचा आहे. रात्रीच्या वेळी कामावरून परतताना किंवा आपत्कालीन परिस्थितीत या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अंधारामुळे ओढ्याचा काठ दिसत नाही. प्रशासनाने येथे त्वरित संरक्षक कठडा न बांधल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.” वैभव भोर ग्रामस्थ

शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

या मार्गावरून अवसरी खुर्द आणि परिसरातील शाळेत जाणारी लहान मुले पायी किंवा सायकलीवरून ये – जा करतात. ओढ्याला लागूनच रस्ता असल्याने मुलांचा पाय घसरून अपघात होण्याची भीती पालकांना सतावत आहे. त्यामुळे मुलांची शाळा सुटेपर्यंत पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो.

प्रशासकीय पाऊल कधी पडणार ?

आता या संरक्षक कठडयाचा चेंडू स्थानिक प्रशासनाच्या कोर्टात आहे. एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी जाण्यापूर्वी प्रशासन जागे होणार की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणार, याकडे संपूर्ण अवसरी खुर्द, भोरमळा परिसराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!