
आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे किरकोळ घरगुती वादातून पतीनेच स्वतःच्या पत्नीचा लोखंडी गळाने डोक्यात व पाठीवर वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपी पतीला मंचर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अत्यंत शिताफीने तांब्यात घेतले आहे. दीपक गेणबा पारधी (वय ३५, मूळ रा. वारूळवाडी, ठाकरवाडी, ता. जुन्नर, सध्या रा. थोरांदळे, ता. आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत सपना दीपक पारधी (वय ३५) या महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे.

प्रतिनिधी – विश्वजीत गवारी
काय आहे नेमकी घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय इंदोरे यांच्या शेतात आरोपी दीपक पारधी हा पत्नी सपना हिच्यासह राहत होता. दि. ०७/०७/२०२६ रोजी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी दीपक पारधी याने मासे पकडण्याच्या लोखंडी गळाने सपना यांच्या डोक्यात, पाठीवर आणि छातीवर गंभीर वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात सपना यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. याप्रकरणी किसन गंगाभाऊ इंदोरे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा भा.न्या.सं. २०२३ चे कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास आणि पोलिसांची चक्रावली
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. शुभम कुमार, आणि खेड उपविभागाचे पोलीस अधिकारी श्री. अमोल मांडवे यांनी तपासाचे आदेश दिले होते. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने समांतर तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण याद्वारे आरोपीचा शोध सुरू केला.
अशी झाली अटक
दि. ११/०७/२०२६ रोजी पोलिसांना गोपनीय माहितीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी दीपक पारधी हा ता. आंबेगाव आणि जि. पुणे परिसरातील त्याच्या नातेवाईकांकडे लपून बसलेला आहे. या माहितीच्या आधारे मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या कसून चौकशीत त्याने किरकोळ वादातून व मासे पकडण्याच्या लोखंडी गळाने वार करून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.
पोलीस कोठडी सुनावण्यात आली
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला अधिक तपासासाठी दि. १५/०७/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे करत आहेत.

कामगिरी करणारे पोलीस पथक
सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. शुभम कुमार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये मंचरचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमारे, सपोनि मनोज वाघमारे, सपोनि महादेव शेलार, पोलीस हवालदार संजय नाडेकर, शेखर भोर, सुदाम घोडे, स्वप्निल जाधव, योगेश रोडे, अजित पवार, हनुमंत ढोबळे, शरद बांबळे, दिपक साबळे, विक्रम तापकीर, संदिप फंड, संदिप वारे आणि निलेश सुपेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


