प्रमोद बाणखेले

वडिलांनी रागाच्या भरात जाळले कपडे; पारगाव पोलिसांनी दाखवली तत्परता, तात्काळ केली नवीन कपड्यांची मदत

घरच्यांच्याच त्रासाला कंटाळलेल्या एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीला अखेर ‘खाकी वर्दी’ देवदूतासारखी धावून आल्याची कौतुकास्पद घटना आंबेगाव तालुक्यात घडली आहे. वडिलांनी रागाच्या भरात कपडे जाळून घरातून हाकलून लावल्यानंतर, पारगाव पोलिसांनी अवघ्या १० मिनिटांत घटनास्थळी धाव घेत पीडित मुलाला धीर दिला आणि स्वतःच्या पैशाने नवीन कपडे घेऊन देत खाकीतील संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.

प्रतिनिधी – दिपाली खिरड

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, लोणी (ता. आंबेगाव) येथील करण फुलमाळी (वय १६) या मुलाला त्याचे वडील सातत्याने त्रास देत होते. सोमवार (दि. २०) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कौटुंबिक वादातून वडिलांनी करणला बेदम शिवीगाळ केली आणि त्याचे सर्व कपडे पेटवून दिले. या प्रकारामुळे पुरता घाबरलेला करण घरातून बाहेर पडला आणि त्याने तात्काळ मदतीसाठी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला.

पोलिसांची तत्परता आणि माणुसकी

मुलाचा फोन येताच पारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सचिन कांडगे आणि त्यांच्या पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून अवघ्या दहा मिनिटांत धाव घेतली. पोलिसांनी करणवर झालेला अन्याय आणि त्याची सर्व हकीकत अत्यंत सहानुभूतीने ऐकून घेतली. केवळ कायदेशीर प्रक्रिया न करता, पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने पाऊल उचलले.

स्वतः पुढाकार घेऊन दिली नवीन कपड्यांची भेट

करणकडे अंगावरील कपड्यांशिवाय काहीही नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी त्याला तात्काळ दुकानात नेले. स्वतः पुढाकार घेऊन त्याला नवीन कपडे खरेदी करून दिले आणि सन्मानाने घरी सोडले. “यापुढे कधीही कोणताही त्रास किंवा मदत लागल्यास थेट फोन कर,” असा खंबीर आधारही कांडगे यांनी यावेळी करणला दिला.

पारगाव पोलिसांच्या या तत्परतेमुळे आणि दाखवलेल्या माणुसकीमुळे एका अल्पवयीन मुलाला मोठा मानसिक आधार मिळाला असून, पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील कामगिरीचे लोणी धामणी परिसरातून आणि संपूर्ण आंबेगाव तालुक्यातून भरभरून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments