
मागील दोन वर्षांपासून वेठबिगारी (बंधकाम) करत अडकून पडलेल्या लहान मुलांसह एकूण ३८ ऊसतोड कामगारांची जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर येथे मध्यरात्री प्रशासनाने थरारक सुटका केली आहे. विनामोबदला १८-१८ तास सक्तीने काम करून घेणे, जबर मारहाण व शिवीगाळ करणे, आणि कामगारांचे मोबाईल जप्त करून त्यांच्यावर २४ तास पहारा ठेवणाऱ्या आरोपी ट्रॅक्टर मालक व मुकादमाविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रतिनिधी – विश्वजित गवारी
दोन वर्षांपासून छळ आणि उपासमार
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील भिलाटी (आनंदनगर) येथील रहिवासी असलेले फिर्यादी सुरेश रवींद्र सोनवणे हे आपल्या कुटुंबासह आणि गावातील इतर काही लोकांसोबत १० मे २०२४ रोजी सुलतानपूर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील ट्रॅक्टर मालक व मुकादम आरोपी खंडू भानुदास माने रा. वळती, ता. आंबेगाव याच्याकडे ऊसतोड कामासाठी आले होते. सुरुवातीला प्रति कुटुंब अवघ्या २,००० रुपयांची उचल रक्कम त्यांना देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आजतागायत त्यांना कोणत्याही कामाचा हिशोब न देता व मोबदला न देता डांबून ठेवण्यात आले होते. कामगारांकडून रोज १२ ते १८ तास सक्तीने काम करून घेतले जात होते. सुट्टी मागितल्यास किंवा गावी जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास आरोपी खंडू माने हा त्यांना बेदम मारहाण व शिवीगाळ करत असे. कुटुंबातील ११ लहान मुलांनाही मागील दोन वर्षांपासून सोबत अडकवून ठेवण्यात आले होते, ज्यांना ना धड खायला अन्न होते ना अंगावर कपडे; ज्यामुळे मुले कुपोषित होत चालली होती.
चोरीछुपे केलेल्या एका फोनमुळे फुटला वाचा
आरोपी खंडू माने याने बाहेरील जगाशी संपर्क तोडण्यासाठी कामगारांचे मोबाईल आणि आधारकार्ड स्वतःच्या ताब्यात घेतले होते. मात्र, अत्यंत हालाखीत दिवस काढत असताना फिर्यादी सुरेश सोनवणे यांनी एके दिवशी आरोपी खंडू माने याचा मोबाईल त्याच्या नकळत घेतला आणि गावी असलेल्या आपल्या आईला फोन करून आपली व्यथा सांगितली व सुटकेची याचना केली.
१३ जुलैच्या मध्यरात्री प्रशासनाचा छापा आणि सुटका
माहिती मिळताच रत्नाबाई सोनवणे यांनी वकिलांच्या मदतीने थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दिनांक १३ जुलै २०२६ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, तहसीलदार रणजित भोसले, सरकारी कामगार अधिकारी शंकर माळी, पोलीस उपनिरीक्षक जे. आय. पाटील, मंडल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व स्थानिक सरपंच यांच्या मोठ्या फौजफाट्याने सुलतानपूर येथील पाईन मळा या राहत्या ठिकाणी अचानक छापा टाकला. तेथे चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला आणि लहान मुलांसह सर्व ३८ लोकांची आरोपी खंडू माने याच्या तावडीतून सुटका करण्यात आली. प्रशासनाने त्यांचे जप्त केलेले मोबाईल आणि आधारकार्डही परत मिळवून दिले.
आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
याप्रकरणी आरोपी खंडू भानुदास माने याच्याविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात ‘बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम, १९७६’ च्या कलम १६, १७, १८, १९ तसेच ‘भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३’ च्या कलम ११५(२), १२७(४) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जगदेवप्पा इराण्णा पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


