
अखिल भारतीय बैलगाडा संघटना आंबेगाव तालुक्याच्या वतीने नोंदणीकृत बैलगाडा मालक सभासदांची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा वडगाव काशिंबेगाव फाटा येथील “मोरया मंगल कार्यालय” (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे संपन्न होणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
स्वराज्य संवाद – ज्ञानेश्वर खिरड
या सभेचे अध्यक्षपद संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्री. शिवाजी संपत निघोट भूषवणार असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली आगामी काळातील बैलगाडा शर्यतींचे नियोजन आणि विविध विषयांवर महत्त्वपूर्ण विचारविनिमय केला जाणार आहे.
बैलगाडा संघटनेचा सामाजिक बांधिलकीला हातभार
केवळ शर्यतींचे आयोजन न करता सामाजिक बांधिलकी जपण्यातही आंबेगाव तालुका बैलगाडा संघटना नेहमीच अग्रेसर राहिली आहे.
अवकाळीग्रस्त शेतकऱ्याला मदत
आंबेगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे लाखनगाव येथील शेतकरी श्री.जयसिंग ज्ञानेश्वर रोडे यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आंबेगाव तालुका बैलगाडा संघटनेच्या वतीने जमा झालेली आर्थिक मदत सुपूर्द करून मोठा आधार देण्यात आला.
पूरग्रस्तांसाठी ‘किराणा साहित्य कीट’
मराठवाडा, खानदेश व आसपासच्या जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांना मदत करणे हे आद्य कर्तव्य समजून संघटनेने “पूरग्रस्तांसाठी मदत” हे धोरण राबवले. या अंतर्गत पूरग्रस्त कुटुंबांसाठी “किराणा साहित्य कीट” देऊन मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या सभेमध्ये संघटनेच्या या सामाजिक कार्याचाही आढावा घेतला जाईल.
सभेपुढील मुख्य विषय आणि अजेंडा
- शनिवार, दिनांक २७ जुलै २०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त (प्रोसिडिंग) वाचून कायम करणे.
- सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल आणि ताळेबंद (बॅलन्स शीट) पत्रक वाचून मंजूर करणे.
- अखिल आंबेगाव तालुका संघटना या नावाने रजिस्टर करण्यासाठी आलेल्या विनंतीवर चर्चा करून त्याला मंजुरी देणे.
- आगामी सन २०२६-२०२७ या वर्षाच्या नवीन बैलगाडा शर्यत सीजनसाठी सर्व संमतीने जुने नियम कायम ठेवणे किंवा त्यात आवश्यक दुरुस्ती करणे, तसेच नवीन नियम करण्याबाबत चर्चा करून मान्यता देणे.
- माननीय अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या इतर ऐनवेळच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे.
यात्रेचे नियोजन न करण्याचे आवाहन (महत्त्वाची टीप)
संघटना आणि कोअर कमिटीच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील सर्व ग्रामस्थ आणि बैलगाडा शौकिनांना विशेष आवाहन करण्यात आले आहे की, ज्या दिवशी (२६ ऑगस्ट रोजी) ही वार्षिक मिटिंग आयोजित केली आहे, त्या दिवशी आंबेगाव तालुक्यामध्ये कोणीही कोणत्याही नवीन किंवा नियोजित बैलगाडा यात्रेचे आयोजन करू नये, जेणेकरून सर्व सभासदांना या महत्त्वपूर्ण सभेला उपस्थित राहता येईल.
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली
या वार्षिक अहवालाच्या सुरुवातीलाच अखिल भारतीय बैलगाडा संघटना आंबेगाव तालुक्याच्या वतीने मा. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत बैलगाडा क्षेत्रासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा आदरपूर्वक उल्लेख करण्यात आला आहे.
ही सभा सर्व नोंदणीकृत बैलगाडा मालकांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने, आंबेगाव तालुक्यातील सर्व नोंदणीकृत सभासदांनी वेळेवर आणि बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोअर कमिटी, संचालक मंडळ आणि संघटनेचे सचिव श्री. सागर दत्तात्रय पाचपुते (वाणी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.


