जाहिरात गवारी

९० वर्षीय वृद्धेची, तिची भावजय आणि भाच्याकडून फसवणूक; ११ लाख ४० हजार लाटल्याप्रकर्णी मंचर पोलिसांत गुन्हा दाखल

मंचर प्रतिनिधी – विश्वजित गवारी
अनाथ आणि वृद्ध महिलेचे सांत्वन करण्याच्या बहाण्याने तिचा विश्वास संपादन केला आणि नंतर तिच्याच आयुष्यभराची पुंजी व हक्काची जमीन हडप केली, असा एक धक्कादायक प्रकार मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. एका ९० वर्षीय वृद्ध महिलेची तिच्याच भावजयीने आणि भाच्याने फसवणूक करून तब्बल ११ लाख ४० हजार रुपये लाटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंचर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गिरजाबाई भगवान भोर (वय ९०, रा. भोरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) या त्यांचे पती २००७ मध्ये मयत झाल्यापासून भोरवाडी येथील शेतजमिनीत एकट्याच राहत होत्या. फिर्यादी यांना कोणतेही अपत्य नसल्याने आणि त्यांचे गुडघे दुखत असल्याने, त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी त्यांची भावजय आरोपी कल्पना दत्तात्रय कोहिनकर ही त्यांना भेटायला येऊ लागली. सुरुवातीला एक-दोन वेळा बाजार आणून देत “मी तुमचा सांभाळ करते, आपण भोरवाडीची जमीन विकू आणि आलेल्या पैशातून तुला घर बांधून देईल,” असे आमिष आरोपी कल्पना हिने फिर्यादी यांना दाखवले. त्यानंतर ती फिर्यादी यांना आपल्या घरी कोहिनकरवाडी (ता.खेड) येथे घेऊन गेली.

बँकेतील पैसे आणि १० लाखांचा चेक लाटला
काही दिवस सांभाळ केल्यानंतर,उपचारासाठी पैसे लागतात असे सांगून आरोपी कल्पना कोहिनकर आणि तिचा मुलगा (फिर्यादीचा भाचा) आरोपी धनंजय दत्तात्रय कोहिनकर या दोघांनी फिर्यादी यांना आवसरी खुर्द येथील बँक ऑफ बडोदामध्ये नेले. तेथून फिर्यादी यांच्या खात्यावरील ९० हजार रुपये काढून ते स्वतःकडे ठेवून घेतले.

त्यानंतर ५ एप्रिल २०२३ रोजी आरोपींनी जमीन विकायची आहे असे सांगून फिर्यादी यांना घोडेगाव येथे नेले आणि तेथे कागदपत्रांवर अंगठे लिहून घेतले. ही जमीन रमेश येवले (रा. पुणे) यांना विकण्यात आली होती. जमीन खरेदीदार रमेश येवले यांनी फिर्यादी यांच्या हातात १० लाख ५० हजार रुपयांचा चेक दिला. मात्र, आरोपी भावजय कल्पना हिने तात्काळ तो चेक फिर्यादी यांच्या हातातून हिसकावून घेतला. फिर्यादी यांनी चेकबाबत विचारणा केली असता, तो बँकेत टाकला असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल करण्यात आली.

फसवणूक करून वृद्धेला सोडले वाऱ्यावर
जमीन नावावर करून घेतल्यानंतर काही महिने आरोपींनी फिर्यादी यांना जेवायला वेळेवर न देणे, आजारपणात दवाखान्यात न नेणे आणि घरातील कामे सांगून छळ करण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून फिर्यादी वृद्ध माऊलीने ते घर सोडले आणि आळंदी येथे जाऊन शनी मंदिरासमोर उघड्यावर भिक मागून त्या आपला उदरनिर्वाह करू लागल्या. काही महिन्यांनी फिर्यादी यांच्या बहिणीने व भाच्याने शोध घेऊन त्यांना भोरवाडी येथे नातेवाईकांकडे आणून सोडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी गिरजाबाई भोर यांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांची कारवाई
फिर्यादी गिरजाबाई भोर यांच्या संमतीशिवाय बँकेतून १० लाख ५० हजार रुपयांचा चेक व बँकेतील ९० हजार रुपये, असे एकूण ११,४०,०००/- रुपयांची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सौ. कल्पना दत्तात्रय कोहिनकर आणि श्री. धनंजय दत्तात्रय कोहिनकर (दोघे रा. कोहिनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३(५), ३१८(२) आणि ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments