
आळेफाटा (पुणे) – घरगुती वादाचे पर्यवसान एका भीषण गुन्ह्यात झाल्याची धक्कादायक घटना आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून आणि घरातील सततच्या कटकटीला कंटाळून एका नराधम बापाने स्वतःच्या दोन चिमुरड्या मुलांचा गळा आवळून त्यांना जंगलात फेकून दिले. या हृदयद्रावक घटनेत ३.५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून, ५ वर्षांचा मुलगा सुदैवाने बचावला आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – दिपाली खिरड
घटनेची पार्श्वभूमी
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. मोशी, जि. पुणे) याची पत्नी सहा महिन्यांपूर्वी त्याला आणि मुलांना सोडून गेली होती. तेव्हापासून घरात सातत्याने वाद आणि कटकटी होत होत्या. याच रागातून ५ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास सागरने आपली मुले आर्यन (वय ५ वर्षे) आणि हर्षदा (वय ३.५ वर्षे) यांना “फिरायला नेतो” असे सांगून घराबाहेर नेले.
थरार मध्यरात्रीचा
आरोपीने दोन्ही मुलांना आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘फाउंटन हॉटेल‘ समोरील निर्जन जंगलात नेले. रात्री ११:३० च्या सुमारास त्याने रागाच्या भरात दोघांचाही गळा आवळला. आर्यन मृत पावला आहे असे समजून त्याला तेथेच सोडून दिले, तर हर्षदाचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने झाडाझुडपात फेकून दिला.
मुलाने सांगितली आपबीती
दुसऱ्या दिवशी (दि. ६ मे) सकाळी, वडगाव आनंद गावचे पोलीस पाटील दत्तात्रय चोघुले यांना ५ वर्षांचा आर्यन हा मुलगा निराधार अवस्थेत फिरताना आढळला. त्यांनी तातडीने त्याला आळेफाटा पोलीस ठाण्यात नेले. तिथे विचारपूस केली असता आर्यनने सांगितले की, “पप्पा मला आणि बहिणीला फिरायला न्यायचे सांगून मोशीवरून इथे घेऊन आले. त्यांनी आम्हाला रात्री जंगलात सोडले, आता पप्पा आणि हर्षदा कुठे आहेत मला माहित नाही
असा उघड झाला गुन्हा
दुसऱ्या दिवशी ६ मे रोजी सकाळी ७:३० वाजता सागर एकटाच घरी परतला. मुलांबाबत विचारले असता त्याने “ती चाकणला रूमवर आहेत” असे खोटे सांगितले. मात्र, त्याच वेळी आळेफाटा परिसरात आर्यन हा मुलगा बेवारस स्थितीत पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी तपास चक्रे फिरवून त्याच्या आजोबांशी (सदाशिव शिंदे) संपर्क साधला. भोसरी एम.आय.डी.सी. आणि आळेफाटा पोलिसांनी संयुक्त तपास करत सागरला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपीने सांगितले की, घरातल्या सततच्या किरकिरीला कंटाळून त्याने दोन्ही मुलांचा गळा दाबून त्यांना जंगलात फेकले होते. त्याने दाखवलेल्या घटनास्थळी पोलिसांना हर्षदा या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला.
कायदेशीर कारवाई
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ओंकार अशोक खुणे यांनी फिर्याद दिली असून, आळेफाटा पोलिसांनी आरोपी सागर शिंदे विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १०९, ९३ आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी ही श्री. संदिप सिंह गिल्ल साो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. रमेश चोपडे साो. अपर पोलीस अधिक्षक पुणे, मा. धनंजय पाटील साो उपविभागीय पोलीस अधिकारी साो जुन्नर उपविभाग, जुन्नर मा. प्रमोद क्षिरसागर साो. पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, विश्वास जाधव यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे स. पो.नि अमोल पन्हाळकर, श्रे.पो.स.ई टाव्हरे, पो. हवा विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, पोपट कोकाटे, विकास गोसावी, पो. कॉ नविन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप, प्रशांत तांगडकर, कांचन रानडे यांनी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.


