
मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी या दोन्ही महत्त्वाच्या मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी शटल बस सेवा सुरू करण्याच्या मागणीची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) गंभीर दखल घेतली आहे. महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या वाहतूक विभागाने या संदर्भातील प्रस्ताव पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पुणे विभाग नियंत्रकांकडे वर्ग केला असून, योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
प्रतिनिधी – दिपाली खिरड
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आंबेगाव तालुका अध्यक्ष किरण बाबाजी वाळुंज यांनी या दोन्ही मार्गांवर शटल बस सेवा सुरू करण्याबाबत माननीय परिवहन मंत्री यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले होते. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिकांना दररोज प्रवासासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना सुलभ, सुरक्षित व नियमित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने किरण वाळुंज यांनी हा पाठपुरावा केला होता.
परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयामार्फत सदर निवेदन एसटी महामंडळाच्या मुख्य वाहतूक विभागाकडे पाठविण्यात आले होते. हा विषय पुणे विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने, महामंडळाने हे निवेदन विभाग नियंत्रक (पुणे विभाग) यांच्याकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवले असल्याचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्या स्वाक्षरीच्या अधिकृत पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्राची प्रत भाजपा तालुका अध्यक्ष किरण वाळुंज यांना प्राप्त झाली आहे.
मंचर–लोणी–शिरूर तसेच राजगुरूनगर–पाबळ–लोणी या मार्गांवर शटल बस सेवा सुरू झाल्यास परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि सर्वसामान्यांना परवडणारी होणार असल्याने, एसटी प्रशासनाच्या या सकारात्मक पावलामुळे नागरिकांमधून व प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
व्हिडिओ बातम्या पाहण्यासाठी👇 येथे क्लिक करा 👇


