
नागापूर येथून 22,200 रुपयांच्या लोखंडी प्लेटा चोरी करणाऱ्या आरोपीला पारगाव पोलिसांनी देवगाव फाट्यावर सापळा रचून अटक केली. सपोनि सचिन कांडगे यांच्या पथकाने 37 प्लेटा जप्त केल्या. साथीदार फरार.
प्रतिनिधी – विश्वजित गवारी
आंबेगाव तालुक्यातील पारगाव (कारखाना) पोलिसांनी बांधकाम साहित्य चोरी करणाऱ्या सराईत टोळीवर मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे देवगाव हद्दीतील काठापूर बु. फाट्यावर सापळा रचून पोलिसांनी चोरीच्या मालासह एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या 22 हजार 200 रुपये किमतीच्या एकूण 37 लोखंडी प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.
नेमके काय घडले होते?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 ते दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7 या कालावधीत मौजे नागापूर, मिंढेवस्ती, ता. आंबेगाव येथील एका बांधकाम साईटवरून लोखंडी प्लेटा चोरीस गेल्या होत्या. फिर्यादीच्या तक्रारीनुसार 22,200 रुपये किमतीच्या 37 प्लेटा अज्ञात चोरट्याने लंपास केल्या होत्या.
याप्रकरणी पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अन्वये गु.र.नं. 63/2026 नुसार दिनांक 12 जून 2026 रोजी रात्री 8 वाजून 6 मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहिती ठरली कळीचा मुद्दा
गुन्हा दाखल होताच पारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी तात्काळ तपास पथक तयार करून तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान सपोनि कांडगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, देवगाव येथील काठापूर बु. फाट्यावर एक इसम चारचाकी गाडीतून चोरीचा माल घेऊन येणार आहे.
माहिती मिळताच सपोनि कांडगे यांनी पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अमोल वडेकर, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग आणि चंद्रकांत गव्हाणे यांच्या पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
असा लागला सापळ्यात आरोपी
पोलिसांच्या पथकाने दिनांक 13 जून रोजी देवगाव गावच्या हद्दीतील काठापूर बु. फाट्यावर सापळा रचला. काही वेळातच एक संशयित पांढऱ्या रंगाचा छोटा हत्ती टेम्पो येताना दिसला. पोलिसांनी तत्काळ वाहन थांबवून तपासणी केली असता, टेम्पोमध्ये बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेटा आढळून आल्या.
वाहन चालकास नाव व पत्ता विचारला असता त्याने अतिश दिलीप गव्हाणे, वय 19 वर्षे, रा. कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. कोहकडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर असे सांगितले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी गडबडला.
साथीदारासह चोरीची कबुली
पोलिसांनी वाहन व प्लेटांबाबत अधिक विचारणा केली असता, आरोपी अतिश गव्हाणे याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, सदरच्या लोखंडी प्लेटा त्याने त्याचा मित्र रतन मांगीलाल राठोड, रा. पारगाव, ता. आंबेगाव याच्या सोबत मिळून नागापूर येथील बांधकाम साईटवरून चोरी केल्या आहेत.
पोलिसांनी आरोपी अतिश गव्हाणे याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या 22,200 रुपये किमतीच्या एकूण 37 लोखंडी प्लेटा 100 टक्के हस्तगत केल्या आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेला छोटा हत्ती टेम्पोसुद्धा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी रतन मांगीलाल राठोड फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, पथकाचे कौतुक
सदरची संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या यशस्वी कामगिरीबद्दल सपोनि सचिन कांडगे, पोउपनि भाऊसाहेब लोहकरे, पोहवा अमोल वडेकर, पोहवा अविनाश कालेकर, पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे आणि पोलीस मित्र रामदास वाळुंज यांचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करत आहेत.
आंबेगाव तालुक्यात वाढत्या चोऱ्या
गेल्या काही महिन्यांपासून आंबेगाव तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. तर चोरीच्यागुन्ह्यांच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पारगाव पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या तत्पर कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.


