1782234614371

घरमालकांनो सावधान! भाडेकरूंची माहिती लपवणे महागात; मंचरमध्ये घरमालकावर गुन्हा दाखल

मंचर येथील असणाऱ्या परिसरात भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात जमा न केल्याप्रकरणी एका ५१ वर्षीय घरमालकावर मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे. आगामी काळात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी ही मोहीम तीव्र केली असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या घरमालकांवर आता थेट गुन्हे दाखल केले जात आहेत.

स्वराज्य संवाद – मंचर प्रतिनिधी

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये, सर्व घरमालकांना त्यांच्याकडील भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात कळवणे अनिवार्य केले आहे. मंचर शहरात परप्रांतीय आणि संशयास्पद व्यक्तींच्या वास्तव्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

दि. ७ मे २०२६ रोजी सायंकाळी ८:१५ च्या सुमारास मंचर पोलिसांनी ‘संकल्प रेसिडेन्सी’ (बागल मळा) येथे तपासणी केली. यावेळी कोणताही करार न करता जाधव हे गेल्या दीड वर्षांपासून भाडेकरू राहत असल्याचे आढळले. मात्र, घरमालक यांनी सदर भाडेकरूची कोणतीही माहिती पोलीस ठाण्यात दिली नव्हती, तसेच त्यांच्यात कोणताही कायदेशीर भाडेकरार झाला नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १६३ नुसार लागू केलेल्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याप्रकरणी मंचर पोलीस कॉन्स्टेबल अजित पवार यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मंचर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३ अन्वये घर मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

“मंचर शहर आणि परिसरातील सर्व घरमालकांना पोलीस प्रशासनातर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की, आपल्या घरात राहणाऱ्या प्रत्येक भाडेकरूची संपूर्ण माहिती आणि कागदपत्रे त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करावीत. सुरक्षेच्या दृष्टीने भाडेकरूचा अधिकृत भाडेकरार (Rent Agreement) करणे कायदेशीररित्या आवश्यक आहे. एखादी अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती माहिती न देता आपल्या मालमत्तेत राहत असल्यास, ते कायद्याने गंभीर गुन्हा असून अशा घरमालकांवर कडक पोलीस कारवाई करण्यात येईल. शहराची शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments