
दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे आद्य संस्थापक स्व. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील (दादा) यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यस्थळावरील स्मारकस्थळी आणि भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात त्यांना भावपूर्ण व विनम्र आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कारखान्याचे पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारगाव प्रतिनिधी – दिपाली खिरड
विकासाची दूरदृष्टी हीच तालुक्याची ओळख
स्व. दत्तात्रय वळसे पाटील (दादा) यांच्या स्मृतींना उजाळा देताना कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील म्हणाले, “दादांनी आयुष्यभर जनसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून कार्य केले. एकेकाळी दुष्काळी परिस्थितीशी झुंजणाऱ्या आंबेगाव तालुक्यात त्यांनी शिक्षण, सहकार, सिंचन आणि पायाभूत सुविधांची भक्कम पायाभरणी केली. त्यांनी रुजवलेल्या याच विकासदृष्टीतून आजचा प्रगत आणि सुजलाम-सुफलाम तालुका घडताना दिसत आहे.”
जनसेवेची परंपरा पुढे नेणे हीच खरी आदरांजली
पुढे बोलताना प्रदीप वळसे पाटील म्हणाले, “दादांची शिस्तबद्ध कार्यपद्धती, लोकांशी जोडलेली घट्ट नाळ आणि समाजकारणाकडे पाहण्याची सर्वसमावेशक भूमिका ही आम्हा सर्वांसाठी आजही अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी सामान्य माणसाच्या कल्याणासाठी जपलेली विकासाची आणि जनसेवेची ही पवित्र परंपरा अधिक जोमाने पुढे नेणे, हीच त्यांना दिलेली खरी आणि प्रगल्भ आदरांजली ठरेल.”
मान्यवरांची मोठी उपस्थिती
या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे तसेच संचालिका प्रिया बाणखेले यांनी स्मारकस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी जनरल मॅनेजर शिरीष सुर्वे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, किशोर तिजारे, दिलीप कुरकुटे, प्रतापसिंह सावंत, सुरेश शिंदे, अमीर पठाण, ब्रिजेश लोहोट, अनिल बोंबले, कैलास गाढवे, बी.डी.चव्हाण, नाथा मोकाटे, वसंत जाधव यांच्यासह भीमाशंकर साखर कारखाना व शिक्षण संस्थेतील सर्व विभागांचे प्रमुख, कामगार बांधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील ग्रामस्थ दादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते

