WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

दारूसाठी पैसे नाकारल्याने वृद्धाची काठीने बेदम मारहाण करून हत्या; घोडेगाव येथील धक्कादायक प्रकार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घोडेगाव प्रतिनिधी – विश्वजित गवारी

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या शुल्लक कारणावरून एका ५७ वर्षीय वृद्धाची लाकडी काठीने डोक्यावर आणि पाठीवर बेदम मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घोडेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी घोडेगाव पोलिसांनी तात्परतेने कारवाई करत आरोपीला २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र रघुनाथ सहाणे (वय ५७, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार जीवन अंकुश गवारी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, महेंद्र सुभाष शिंदे (रा. घोडेगाव) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पैशांच्या वादातून थरारक हत्याकांड ?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घोडेगाव येथील आनंदबार जवळ असलेल्या देशी दारूच्या दुकानाच्या गेटसमोर ही घटना घडली. आरोपी महेंद्र शिंदे याने राजेंद्र सहाणे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र, सहाणे यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. याचाच राग अनावर झाल्याने आरोपी महेंद्र शिंदेने तिथेच पडलेली एक लाकडी काठी उचलली आणि सहाणे यांच्या डोक्यावर, पाठीवर तसेच हातापायांवर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या गंभीर मारहाणीमुळे राजेंद्र सहाणे हे रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळीच बेशुद्ध पडले, तर आरोपी तेथून पसार झाला.

भावाने घेतली धाव, डॉक्टरांनी घोषित केले मृत

राजेंद्र सहाणे हे बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळताच त्यांचे भाऊ चंद्रकांत सहाणे (वय ६०) यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने राजेंद्र सहाणे यांना उपचारासाठी घोडेगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीपूर्वीच राजेंद्र सहाणे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात ‘डोक्यामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव’ झाल्यानेच हा मृत्यू झाल्याचे समोर आले.

CCTV फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीमुळे गुन्ह्याचा उलगडा

घोडेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. सागर पवार यांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळाचा पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, एका इसमाने काठीने बेदम मारहाण केल्याचे दृश्य मिळाले. पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार याचा शोध घेतला. त्यानंतर साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्याचा मित्र महेंद्र शिंदे यानेच पैशांच्या वादातून सहाणे यांना डोळ्यादेखत मारहाण केल्याचे सांगितले.

पोलिसांची तत्परता, आरोपीने दिली कबुली

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून घोडेगाव पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आरोपी महेंद्र सुभाष शिंदे याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या कडक चौकशीत त्याने रागाच्या भरात काठीने मारहाण करून हत्या केल्याची कबुली दिली, या संपूर्ण घटनेचा पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर पवार हे करत असून आरोपीवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे घोडेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!