जाहिरात गवारी

मयत पतीच्या जागी ‘तो’ तोतया उभा केला; बिल्डरांनी विधवा महिलेचे ३ फ्लॅट्स हडपले

पुणे ग्रामीणमधील जुन्नर तालुक्यातून विश्वासघाताचा एक अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. ज्या बिल्डरांवर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यांनीच कुटुंबाचा घात केला. जमीन विकासाच्या नावाखाली एका मृत व्यक्तीच्या जागी चक्क ‘तोतया’ माणूस उभा करून बनावट पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी बनवली आणि त्याआधारे एका ५९ वर्षीय विधवा महिलेचे ३ फ्लॅट्स परस्पर विकून टाकल्याचा खळबळजनक गुन्हा ओतूर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

प्रतिनिधी – विश्वजित गवारी

काय आहे नेमके प्रकरण ?
ठिकेकरवाडी येथील ५९ वर्षीय महिला शेतकरी श्रीमती वैशाली प्रभाकर ठिकेकर यांनी ओतूर पोलिसांत धाव घेत या मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. २०१५ मध्ये फिर्यादी यांच्या पतीने (मयत प्रभाकर ठिकेकर) ओतूर येथील त्यांची ५ आर जमीन विकसित करण्यासाठी ‘प्रयोग कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स’ च्या योगेश शिरोळे आणि भागीदारांना दिली होती. ठरलेल्या लेखी करारानुसार, बिल्डरने ठिकेकर कुटुंबाला इमारतीमधील ३५ टक्के हिस्सा (फ्लॅट्स आणि गाळे) देणे बंधनकारक होते.

नियोजित कट: जिवंत पतीला कागदावर ठरवले ‘बाहुले’
गुन्हा दाखल झाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये प्रभाकर ठिकेकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जेव्हा त्यांच्या पत्नीने कागदपत्रांची तपासणी केली, तेंव्हा समोर आलेले सत्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आरोपींनी ११ ऑगस्ट २०१५ रोजीच एक भयानक कट रचला होता. मूळ जमीनमालक प्रभाकर ठिकेकर यांना अंधारात ठेवून, त्यांच्या जागी विश्वास सयाजी शिंगोटे नावाच्या तोतया व्यक्तीला रजिस्ट्रार ऑफिसमध्ये उभे केले गेले! ठिकेकर यांच्या बनावट सह्या आणि अंगठे करून एक खोटे कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) तयार करण्यात आले, ज्याद्वारे सर्व फ्लॅट्स विकण्याचे अधिकार बिल्डरांनी स्वतःकडे लाटले.

हक्काच्या घरांवर घातला दरोडा; परस्पर केली विक्री
या बनावट कागदपत्रांच्या जोरावर आरोपींनी ठिकेकर कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या विंग-ए मधील फ्लॅट,आणि विंग-बी मधील फ्लॅट या सदनिकांची कोणतीही संमती न घेता आणि एक रुपयाचाही मोबदला न देता परस्पर विक्री करून टाकली.

बिल्डरांसह तोतयावर गुन्ह्यांचा पाश
फिर्यादी महिलेच्या तक्रारीनंतर ओतूर पोलिसांनी या टोळीविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत.पोलिसांनी १) योगेश एकनाथ शिरोळे (रा. भिवंडी), २) शुभांगी चंद्रकांत भोर (रा. भिवंडी), ३) चंद्रकांत दशरथ भोर (रा. मुंब्रा, ठाणे), ४) विश्वास सयाजी शिंगोटे (तोतया आरोपी, रा. डोमेवाडी, जुन्नर), या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०,४६५, ४६८,४७१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप आमणे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात काळे झाले आहेत का ? याचा शोध पोलीस घेत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments