जाहिरात गवारी

पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या नावाखाली १२ लाखांची फसवणूक; जुन्नर-आंबेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांना गंडा❗गुन्हा दाखल.

पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत शेतात आणि फार्महाऊसवर सोलर पॅनल बसवून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी घोडेगाव पोलीस ठाण्यात आरोपी राजेंद्र महादेव बोऱ्हाडे (रा. आळेफाटा, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिनिधी – विश्वजित गवारी

पोलिसात तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी लक्ष्मण मनाजी काचोळे (वय ६७, रा. पिंपळगाव घोडे, ता. आंबेगाव) यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली आहे. फिर्यादी यांनी आपल्या फार्महाऊसवर ३ केव्ही क्षमतेचा सोलर पॅनल बसवण्यासाठी आरोपी राजेंद्र बोऱ्हाडे याच्याशी संपर्क साधला होता. आरोपीने शासकीय सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सोलर साहित्याच्या खरेदीसाठी दिनांक ६ मार्च रोजी ऑनलाईन आणि रोख, अशी एकूण १,७०,०००/- रुपयांची ॲडव्हान्स रक्कम उकळली. मात्र, पैसे घेऊनही दोन महिन्यांत कोणतेही काम न करता आरोपीने टाळाटाळ सुरू केली व अखेर आपला फोन बंद करून तो फरार झाला.

परिसरातील ७ शेतकऱ्यांना लावला लाखो रुपयांचा चुना

फिर्यादी काचोळे यांनी याबाबात अधिक चौकशी केली असता, आरोपी राजेंद्र बोऱ्हाडे याने परिसरातील अनेक नागरिकांना अशाच प्रकारे गंडा घातल्याचे उघडकीस आले. आरोपी राजेंद्र बोऱ्हाडे याने फिर्यादी लक्ष्मण काचोळे यांच्यासह एकूण ७ जणांची मिळून १२,४४,२७४/- रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.

पारगाव कारखाना पोलीस ठाण्यातही आधीच गुन्हा दाखल

विशेष म्हणजे, अशा प्रकारे फसवणूक करण्याची आरोपीची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील अवघ्या काही दिवसांपूर्वीच पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात अशाच स्वरूपाचा आर्थिक फसवणुकीचा गुन्हा या आरोपीवर दाखल झालेला आहे. शासकीय योजनांचे खोटे आमिष दाखवून ग्रामीण भागातील निरक्षर आणि गरजू शेतकऱ्यांना लक्ष्य करण्याची आरोपीची ही ठरवून केलेली कार्यपद्धती असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून येत आहे.

पोलीस तपास सुरू

सदर गुन्याची नोंद दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments