
आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथील एका हॉटेलमध्ये दारूच्या नशेत धिंगाणा घालत वेटरने हॉटेलमधील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. इतकेच नव्हे तर हॉटेलमालकाची दुचाकी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गल्ल्यातील रोख रकमेसह ६५ हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या मंचर पोलीस ठाण्यात आरोपी वेटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिनिधी – विश्वजित गवारी
दारू पिऊन वेटरचा हॉटेलमध्ये राडा
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश जाधव हा फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला होता. २९ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील आचारी वैभव कदम याने फिर्यादी अभिजीत वाळुंज यांना फोन करून माहिती दिली की, आरोपी गणेश जाधव याने दारू पिऊन हातात बांबू घेऊन इतर कामगारांना मारहाण सुरू केली आहे. त्यामुळे घाबरून कामगार हॉटेल सोडून चालले आहेत. माहिती मिळताच फिर्यादी, त्यांचे वडील आणि भाऊ तातडीने हॉटेलवर पोहोचले. त्यांनी कामगारांची भांडणे सोडवली आणि दारू पिऊन राडा घातल्याबद्दल आरोपी गणेश जाधवला कडक शब्दांत जाब विचारला. त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले.
हॉटेलची तोडफोड आणि रकमेची चोरी
तदनंतर या भांडणाचा राग मनात धरून आरोपी गणेश जाधव याने पहाटे ५ वाजण्यापूर्वी हॉटेलमध्ये मोठी तोडफोड केली. त्याने हॉटेलमधील एल.ई.डी. टीव्ही, डी.व्ही.आर. मशीन, तीन फ्रिज आणि पी.सी. (कंप्युटर) ची तोडफोड करून हॉटेलचे मोठे नुकसान केले.
तोडफोड केल्यानंतर आरोपीने हॉटेलसमोर पार्क केलेली ॲक्टिव्हा होंडा कंपनीची दुचाकी, रुपयांचे डी.व्ही.आर. मशीन आणि हॉटेलच्या गल्ल्यातील ५,०००/- रुपयांची रोख रक्कम, असा मुद्देमाल फिर्यादीच्या संमतीशिवाय बेकायदेशीरपणे चोरून नेला व तेथून पळ काढला.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सकाळी हॉटेलची झालेली दुरवस्था आणि चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर फिर्यादी अभिजीत वाळुंज यांनी मंचर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. मंचर पोलिसांनी २९ जुलै २०२६ रोजी आरोपी वेटर गणेश पांडुरंग जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०६ आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तानाजी हगवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


