जाहिरात गवारी

सबसिडीवर सोलर देतो म्हणून शेतकऱ्याला गंडा; गुन्हा दाखल

घर आणि शेतातील विहिरीवर सबसिडी अंतर्गत सोलर सिस्टीम तसेच सोलर पंप बसवून देण्याच्या बहाण्याने एका शेतकरी कुटुंबाची २ लाख १५ हजार ६०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेगाव तालुक्यात समोर आला आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रतिनिधी – विश्वजित गवारी

बँक अधिकाऱ्यामार्फत झाली होती ओळख

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता देवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे कुटुंब शेतीला जोडधंदा निर्माण करण्यासाठी साधारण दीड वर्षांपूर्वी कॅनरा बँक मंचर येथे कर्ज काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी बँकेचे अधिकारी प्रफुल्ल पी.रहाणे यांनी फिर्यादीच्या जागेची पाहणी केली आणि कर्ज मंजूर होण्यास सरकारी पोर्टल अपडेटच्या कामामुळे पाच ते सहा महिने लागतील असे सांगितले. याच दरम्यान सोलर सिस्टीमचा विषय निघाल्याने बँक अधिकाऱ्याने आरोपी राजेंद्र माधव बोऱ्हाडे याचा मोबाईल नंबर फिर्यादीच्या कुटुंबाला दिला आणि त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

सबसिडीवर सोलर बसवण्याचा बहाणा आणि खर्चाचे आमिष

दरम्यान बँक अधिकाऱ्याने दिलेल्या नंबरवर फिर्यादीच्या मुलाने संपर्क साधला असता, आरोपी राजेंद्र बोऱ्हाडे याने सबसिडीवर सोलर बसवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या घरी आणि शेतातील विहिरीची पाहणी केली. घराच्या छतावर सोलर बसवण्यासाठी १,९१,००० रुपये आणि विहिरीवरील सोलर पंपासाठी ३४,२०० रुपये, असा एकूण २,२५,२०० रुपये खर्च येईल असे आरोपीने फिर्यादीला सांगितले.

अशी झाली आर्थिक फसवणूक

आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी कुटुंबाने फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत वेळोवेळी त्यांच्या बँक खात्यावरून ‘राजमाता डायग्नोस्टिक्स’ च्या नावे ऑनलाईनद्वारे पैसे पाठवले. आरोपीने “एवढ्या पैशात काम होणार नाही” असे सांगून दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने पैसे उकळले.

त्यानंतर सोलरचे लोखंडी स्ट्रक्चर उभे करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याचे सांगत आरोपीने फिर्यादीच्या घरी येऊन काही रुपये रोख रक्कमही नेली. अशा प्रकारे आरोपीने वेळोवेळी एकूण २,१५,६००/- रुपये ऑनलाईन आणि रोख स्वरूपात गोळा केले.

काम न करता दिली हुलकावणी, अखेर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, पैसे घेऊनही आरोपीने केवळ लोखंडी स्ट्रक्चर उभे केले आणि सोलर प्लेट्स न बसवता टाळाटाळ सुरू केली. फिर्यादीच्या कुटुंबाने कामाचा तगादा लावला असता, “अजून पैसे दिल्याशिवाय पुढील काम करणार नाही,” अशी भूमिका आरोपीने घेतली. आपली फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी संगीता देवडे यांनी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पारगाव कारखाना पोलिसांनी आरोपी राजेंद्र माधव बोऱ्हाडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८(४) आणि ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजित मडके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments