
पोंदेवाडी (खारावस्ती) भागात राहत्या घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या एका वृद्धेच्या घरात प्रवेश करून अज्ञात ४ चोरट्यांनी ७६,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यात ४ अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिनिधी – विश्वजित गवारी
घर उघडे असण्याचा फायदा घेतला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुलाबाई पंढरीनाथ सुक्रे रा.पोंदेवाडी, खारावस्ती या ९ जून २०२६ रोजी रात्री जेवण करून घरात झोपल्या होत्या. घरात प्रचंड उकाडा होत असल्यामुळे त्यांनी मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद न करता फक्त लोटून (अर्धवट उघडा) ठेवला होता. याच गोष्टीचा गैरफायदा घेत रात्री १०:०० ते मध्यरात्री १:०० वाजण्याच्या सुमारास ४ अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
तोंडाला रुमाल बांधून आलेले चोरटे
मध्यरात्री १:०० वाजण्याच्या सुमारास सुलाबाई यांना अचानक जाग आली. त्यावेळी त्यांना तोंडाला काळे रुमाल बांधलेले ४ अज्ञात इसम घराबाहेर पळताना दिसले. जाताना चोरट्यांनी सुलाबाई यांच्या घराची कडी बाहेरून लावून घेतली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत दरवाजा उघडला.
चोरीला गेलेला मुद्देमाल
घरातील कोपऱ्यात ठेवलेल्या पिशवीची तपासणी केली असता, त्यातील सोन्याची चैन, सोन्याचे मंगळसूत्र/पोत, सोन्याची काळी मणी असलेली पोत, सोन्याची पानपोत, सोन्याची कानफुले एकूण मुद्देमाल ७६,०००/- रु.चे दागिने चोरीला गेल्याचे समजले.
घाबरल्यामुळे तक्रारीस उशीर
घटना घडल्यानंतर फिर्यादी महिला प्रचंड घाबरली होती. अखेर घरच्या लोकांनी धीर दिल्यानंतर त्यांनी २७ जुलै २०२६ रोजी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५ आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजित मडके करत आहेत.


