प्रमोद बाणखेले

मंचरमध्ये स्क्रॅप गोदामात कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला; कामगार संशयित

मंचर येथील बायपास जवळील रामकृष्ण हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या ताराई प्रोजेक्ट स्क्रॅप गोडाऊन मध्ये एका कंत्राटदारावर अज्ञात कारणावरून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिनिधी – विश्वजित गवारी

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार संदीप रबाजी शेटे (वय ४०, रा. मंचर) हे ताराई प्रोजेक्ट स्क्रॅप गोदामात गेल्या तीन वर्षांपासून मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या हाताखाली भंगार तोडफोडीचे काम करणारे कंत्राटदार बंटीलाल अगरदी निशाद (वय ४०, रा. उत्तर प्रदेश) हे गोदामाच्या पाठीमागील पत्राच्या खोलीत राहत होते.

दिनांक २२ जुलै २०२६ रोजी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास बंटीलाल हे आपल्या खोलीत स्वयंपाक करत होते. त्यावेळी तिथे त्यांचा कामगार सनीदेव चंदराम केवट (वय २१, रा. मंचर, मूळ रा. उत्तर प्रदेश) हा देखील हजर होता. काही वेळाने सनीदेव याने इतर कामगारांना बंटीलाल शेठ यांना काहीतरी झाल्याचे सांगितले. मॅनेजर संदीप शेटे आणि इतर कामगारांनी खोलीत जाऊन पाहिले असता, बंटीलाल हे गॅस शेगडीजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.जखमी बंटीलाल यांना तातडीने रुग्णवाहिकेतून मंचर येथील सिद्धी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासलेअंती जखमीला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यास सांगितले.

पोलिसांत गुन्हा दाखल
घटना घडली तेव्हा खोलीत फक्त बंटीलाल आणि सनीदेव हे दोघेच हजर होते. त्यामुळे सनीदेव चंदराम केवट यानेच कोणत्यातरी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने डोक्यात मारून कंत्राटदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. या फिर्यादीवरून मंचर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१) आणि ११८(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष मांडवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments