
आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडेवाडी येथे शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पारंपारिक पोशाखात सजलेले बाल वारकरी आणि विठ्ठल-रखुमाईच्या नामघोषाने संपूर्ण लांडेवाडी गाव भक्तीरसात न्हाऊन निघाले.
प्रतिनिधी – दिपाली खिरड
कार्यक्रमाची सुरुवात गावच्या प्रथम नागरिक आदर्श सरपंच सौ. संगीताताई शेवाळे आणि शाळेतील शिक्षिका यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी व पालखीचे विधिवत पूजन करून झाली. याप्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष मा. खंडेराव तात्या आढळराव, माजी सरपंच श्री. जाणकू दादा पानसरे, विविध कार्यकारी संस्थेचे संचालक श्री. अशोकमामा गव्हाणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दिनकर पाबळे आणि उपाध्यक्ष श्री. संतोष लांडे यांसह अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

भव्य गाव प्रदक्षिणा आणि अभंग सादरीकरण
पूजनानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या चिमुरड्या विद्यार्थिनी आणि हातात टाळ-मृदंग घेतलेले बाल वारकरी सर्वांचे आकर्षण ठरत होते. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’च्या जयघोषात बाल वारकऱ्यांनी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घातली. गावातील महिला भगिनी, तरुण मित्र परिवार आणि पालकांनी या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत केले. प्रदक्षिणेनंतर ग्रामदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी एकत्र येत भक्तीमय अभंग सादरीकरण केले.

शाळेच्या प्रांगणात रंगला ‘गोल रिंगण सोहळा’
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते शाळेच्या प्रांगणात पार पडलेला ‘गोल रिंगण सोहळा’. वारकरी परंपरेचे जतन करत विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात गोल रिंगण पूर्ण केले. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण लांडेवाडी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

खाऊ वाटप आणि सांगता
दिंडीच्या यशस्वीतेनंतर उपस्थित सर्व बाल वारकऱ्यांना आणि नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासन व संचालक श्री. अशोकमामा गव्हाणे यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व विद्यार्थ्यांना आषाढी वारीच्या परंपरेची माहिती दिली. शेवटी उपस्थित सर्व बाल वारकरी व ग्रामस्थांचे स्वागत करून आभार मानण्यात आले आणि अत्यंत उत्साहात या भक्तीमय कार्यक्रमाची सांगता झाली.


