
शेतकऱ्यांकडून विश्वासाने लाखो रुपयांचा शेतीमाल खरेदी करून, त्याचे पैसे न देता आर्थिक फसवणूक आणि विश्वासघात केल्याची खळबळजनक घटना खेड तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकारणी संतोष लक्ष्मण मलघे, रा. खरपुडी खुर्द, ता. खेड, जि. पुणे यांनि दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अरुण गुलाब जेटगुले रा. वाणीमळा, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे याच्या विरुद्ध खेड पोलीस ठाण्यात या व्यापाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वराज्य संवाद – विश्वजित गवारी
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष मलघे हे शेती व्यवसाय करतात. त्यांनी मौजे शिरोली (ता. खेड) येथील किसनराव शिंदे यांची शेतजमीन खंडाने (कौलाने) कसण्यास घेतली आहे. या जमिनीत त्यांनी सोयाबीन, बटाटे, वांगी, कोथिंबीर यांसह चिकू आणि शेवग्याची बाग लावली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये मलघे यांची ओळख आरोपी अरुण जेटगुले याच्याशी झाली. ‘मी सर्व प्रकारचा शेतीमाल खरेदी करून पुढे व्यापाऱ्यांना विकतो,’ असे सांगून आरोपीने मलघे यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला जानेवारी २०२५ च्या सुरुवातीला आरोपीने ३०० किलो वांगी रोख पैसे देऊन खरेदी केली आणि मलघे यांचा पूर्ण विश्वास जिंकला.
३ लाख ७९ हजारांचा माल घेतला; दिले फक्त ५० हजार
फिर्यादीचा पूर्ण विश्वास बसल्याचा फायदा घेऊन आरोपीने दि. २८ जानेवारी २०२५ ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत मलघे यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल खरेदी केला यामध्ये बटाटा – १६ रुपये प्रति किलो दराने १५ टन ४ क्विंटल माल (किंमत रु. २,४६,४००/-), वांगी २५ रुपये प्रति किलो दराने ३ टन ८१ किलो, चिकू ६० रुपये प्रति किलो दराने ६१० किलो माल (किंमत रु. ३६,६००/-), कोथिंबीर १० रुपये प्रति गड्डी दराने १४०० गड्ड्या (किंमत रु. १४,०००/-) शेवगा शेगा ५० रुपये प्रति किलो दराने ११० किलो माल (किंमत रु. ५,५००/-) असा एकूण ३,७९,५२५ रुपयांचा शेतीमाल आरोपीने खरेदी केला होता. त्यापैकी आरोपीने सुरुवातीला ५०,००० रुपये रोख दिले. मात्र, उर्वरित ३,२९,५२५ रुपये आजतागायत न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली व विश्वासघात केला.
इतर अनेक शेतकऱ्यांनाही लुटले !
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी अरुण जेटगुले याने केवळ संतोष मलघे यांचीच नव्हे, तर परिसरातील इतर अनेक शेतकऱ्यांचीही अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये गावातील पंडित काळूराम गाडे, तानाजी मलघे, उल्हास काळे, संभाजी मलघे, तसेच पिंपळाची मांजरेवाडी येथील शिवाजी मांजरे, खरपुडी बुद्रुक येथील गणेश जोशी, बाळासाहेब जोशी, आणि दावडी येथील काळूराम गुंडाळ, रविंद्र बोत्रे, विजय तनपुरे व गणपत तनपुरे या सर्व शेतकऱ्यांचा माल उधारीवर घेऊन पैसे न देता त्यांची मोठी फसवणूक केली आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अनेक दिवस वाट पाहूनही हक्काचे पैसे मिळत नसल्याने शेवटी संतोष मलघे यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपी अरुण गुलाब जेटगुले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३१६(२) आणि ३१८(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश गरड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

