WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

पुन्हा सोन अन् 5 हजार लंपास ! वडगाव काशिंबेगमध्ये ‘बाबांच्या वेशातील चोरट्यांची’ दहशत

प्रतिनिधी – विश्वजित गवारी

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग गावाच्या हद्दीत आज दुपारी घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने संपूर्ण परिसर हादरला आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने भिक्षा मागण्याचा बहाणा करून आलेल्या दोन बाबचे वेश्यातील चोरट्यांनी एकट्या महिलेला गुंगीचे औषध लावलेल्या रुमालाने भुलवून तब्बल 5 हजारांची रोकड आणि कानातील सोन्याचे दागिने लांबवले.

काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या या चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत डाव साधला आणि गावकरी जमायच्या आत पोबारा केला. एकाच आठवड्यात अशा प्रकारची ही दुसरी घटना असल्याने गावात महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेचा सविस्तर वृत्तांत

मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक 19 मे 2026 रोजी दुपारच्या सुमारास काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून अंदाजे 25 ते 30 वयोगटातील दोन तरुण वडगाव काशिंबेग गावाच्या हद्दीत शिरले. दोघांनी पॅन्ट-शर्ट परिधान केले होते आणि कपाळाला आडवा गंध लावून ते स्वतःला ‘बाबा’ समजवत होते.

त्यांनी थेट गावातील मानकर वस्ती, दैनेमळा आणि लगतच्या शेतमळ्यांमध्ये जाऊन रस्त्यांची विचारपूस सुरू केली. “रस्ते कोठून कसे जातात” असे भासवत त्यांनी अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण मळ्यांची रेकी केली. यानंतर हे दोघे दैने मळ्यातील एका घराजवळ पोहोचले. “ताई, घरात कोणी आहे का? श्री स्वामी समर्थांच्या नावाने भिक्षा द्या, तुम्हाला पुण्य लागेल” अशी हाक मारत त्यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी घरात एक महिला एकटीच काम करत होती. महिलेने नकार देऊनही, “स्वामी समर्थ” असे म्हणत बाबा वेश्यातील एका चोरट्यांने आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने तिच्या कपाळाला हात लावला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरट्याचे हातात रुमाल होता आणि त्या रुमालाला व हाताला गुंगीकारक औषध लावलेले होते. कपाळाला स्पर्श होताच महिला काही मिनिटांसाठी पूर्णपणे भुलली. ती बाबचे वेश्यातील चोरटे सांगेल तसे वागू लागली. या महिलेने काही दिवसांपूर्वी उसनवारीवर घेतलेले 5 हजार रुपये परत करण्यासाठी बँकेतून काढून आणले होते. ती रक्कम तिने घरातील शिलाई मशीनवर पर्समध्ये ठेवली होती. भुललेल्या अवस्थेतील महिलेकडून त्या भोंदूने ती रक्कम काढून घेतली. इतकेच नव्हे, तर तिच्या कानाला हात लावून कानातील सोन्याचे दागिनेही काढून घेतले.

दरम्यान, काही वेळातच महिलेला थोडीफार शुद्ध येऊ लागल्याचे लक्षात येताच दोन्ही बाबचे वेश्यातील चोरटे घाबरले. पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी तातडीने घरातून पळ काढला आणि बाहेर उभ्या केलेल्या काळ्या स्विफ्ट गाडीमधून गावाबाहेर पसार झाले.

घटनानंतरचा घटनाक्रम :

शुद्धीवर आल्यानंतर सदर महिलेने धावत शेतात जाऊन आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. बातमी वाऱ्यासारखी पसरताच दैने मळा, मानकर वस्ती परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत तातडीने त्या स्विफ्ट कारचा शोध सुरू केला. मात्र, तोपर्यंत चोरटे गावाची हद्द ओलांडून फरार झाले होते.

गावात भीतीचे वातावरण:

विशेष म्हणजे, वडगाव काशिंबेग गावात एकाच आठवड्यात अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. सलग दोन घटनांमुळे गावातील महिलांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. शेतात एकट्याने कामाला जाणेही महिलांना भीतीदायक वाटू लागले आहे. “दिवसा ढवळ्या घरात घुसून असे प्रकार घडत असतील तर आम्ही सुरक्षित कसे राहणार?” असा सवाल ग्रामस्थ महिला करत आहेत.

पोलीस प्रशासनाचे आवाहन :

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. “कोणीही साधू, महाराज किंवा भिक्षेकरी बनून आल्यास त्यांना घरात प्रवेश देऊ नका. आशीर्वादाच्या नावाखाली अंगाला स्पर्श करू देऊ नका. देवाच्या नावाने दान मागणाऱ्या, पुण्य लागेल असे सांगणाऱ्या किंवा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. गावात संशयास्पद व्यक्ती किंवा अनोळखी वाहन आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा किंवा 112 वर कॉल करा. तसेच गावातील तरुणांनी दक्षता पथके स्थापन करून मळ्या-मळ्यांवर लक्ष ठेवावे,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

श्रद्धेच्या नावाने लूट, सावधानताच सुरक्षा

श्रद्धा ही माणसाला जगण्याचे बळ देते, पण याच श्रद्धेचा गैरफायदा घेऊन भोंदू लोक सामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात तेव्हा समाज म्हणून आपण अंतर्मुख होण्याची गरज आहे. वडगाव काशिंबेग येथील घटना ही केवळ चोरी नाही, तर आपल्या ग्रामीण भागातील भाबडेपणा आणि एकटेपणावर घाला आहे. श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज यांची नावे घेऊन दारात येणारा प्रत्येकजण खरा साधूच असतो असे नाही. खरा संत कधीही तुमच्या दारात येऊन पैशाची, दागिन्यांची भीक्षा मागत नाही. तो आशीर्वाद देतो, पण अंगाला हात लावून गुंगीचे औषध वापरत नाही. या घटनेतून दोन गोष्टी स्पष्ट होतात.

एक – गुन्हेगार आता थेट हिंसाचाराऐवजी ‘सायकोलॉजिकल’ आणि ‘केमिकल’ पद्धतीने फसवणूक करू लागले आहेत. रुमालाला गुंगीचे औषध लावून माणसाला बधीर करणे हा नवा ट्रेंड धोकादायक आहे.

दोन – आपली ग्रामीण सुरक्षा व्यवस्था अजूनही ‘घटना घडल्यावर धावणारी’ आहे, ‘घटना टाळणारी’ नाही. प्रत्येक मळ्यावर, वस्तीवर 4-5 तरुणांचे दक्षता पथक असले पाहिजे. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून अनोळखी वाहनाचा नंबर, फोटो लगेच शेअर झाला पाहिजे. शेतात एकट्या काम करणाऱ्या माय-बहिणींनी दुपारी 12 ते 4 या वेळेत जास्त काळजी घ्यावी, कारण याच वेळेत अशा घटना घडतात. शेवटी एकच सांगणे आहे – देव माणसात आहे, दगडात नाही आणि भोंदूच्या रुमालात तर नाहीच नाही. श्रद्धा ठेवा, पण डोळे उघडे ठेवून. कारण तुमची सतर्कता हीच तुमच्या घराची खरी कडी-कोयंडा आहे. पोलीस येतील, पण तोपर्यंत स्व-संरक्षणाची जबाबदारी आपलीच आहे.

ज्ञानेश्वर खिरड – संपादक स्वराज्य संवाद न्यूज

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!