WhatsApp Image 2025-06-01 at 7.03.37 PM (1)

राजगुरूनगर येथे न्यायाधीशांच्या घरात धाडसी घरफोडीचा प्रयत्न ; कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त

राजगुरूनगर (पुणे) : येथील दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या राजगुरूनगर येथील शासकीय निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि बेडरुममधील लोखंडी कपाट व किचनचे ड्रॉवर तोडून सर्व सामान अस्ताव्यस्त केले. सुदैवाने, घरात कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा रोकड नसल्याने मोठा ऐवज चोरीला जाण्यापासून वाचला आहे.

प्रतिनिधी – विश्वजित गवारी


पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या माहितीनुसार, न्यायाधीश या १० मे २०२६ रोजी काही कारणास्तव मुंबईला गेल्या होत्या आणि तिथून नाशिक येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्यांचे घर बंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ही घरफोडी केली. रविवार, दिनांक १७ मे २०२६ रोजी दुपारी १:२४ वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिक यांनी न्यायाधीशांच्या घराचा दरवाजा उघडा आणि कडी-कोयंडा तुटलेला पाहिले. त्यांनी तातडीने न्यायाधीशांना या घटनेची माहिती दिली.


कपाटातील सामान बेडवर फेकले.

माहिती मिळताच न्यायाधीशांचे नातेवाईक हे राजगुरूनगर येथे तातडीने पोहोचले. नातेवाईकांनी घरात जाऊन पाहिले असता बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून सर्व सामान बेडवर अस्ताव्यस्त फेकून दिलेले आढळले, तसेच स्वयंपाकघरातील ड्रॉवरही उघडे होते. न्यायाधीशांच्या घरात कोणतीही मौल्यवान वस्तू नसल्याने काहीही चोरीला गेले नाही. १६ मे रोजी सकाळी १०:३० वाजता न्यायालयातील शिपाई हे घराकडे आले होते, तेव्हा घराचे कुलूप व्यवस्थित होते. त्यामुळे ही घटना १६ मे रोजी सकाळी १०:३० ते १७ मे रोजी दुपारी १:२४ च्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे.


खेड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.

याप्रकरणी खेड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि कलम ६२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुनाजी जाधव या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

कायद्याचा धाक आणि पोलिसांचा वचक हवाच !

राजगुरूनगर येथे थेट न्यायाधीशांच्या बंद निवासस्थानी झालेली घरफोडीची घटना कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. भरवस्तीत दिवसाढवळ्या आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी जर चोरांचे धाडस एवढे वाढत असेल, तर सर्वसामान्यांनी कोणाकडे पाहायचे ? गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती आणि पोलिसांचा वचक असणे हाच कोणत्याही सुरक्षित समाजाचा पाया असतो. केवळ गुन्हे नोंदवून तपास करण्यापेक्षा, गुन्हे घडूच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई आणि पोलिसांची रात्रीची गस्त अधिक प्रभावी होण्याची गरज आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करून गुन्हेगारांवर कडक कायदेशीर प्रहार करावा, जेणेकरून पुन्हा असे धाडस कोणाचेही होणार नाही. आता वेळ केवळ तपासाची नाही, तर कायद्याचा खरा धाक दाखवून देण्याची आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!