
घोडेगाव : प्रतिनिधी दिपाली खिरड
आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथे एका ७५ वर्षीय जेष्ठ नागरिकाला गाठून, देवस्थानला देणगी देण्याच्या बहाण्याने त्यांच्या अंगावरील १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बबन गणपत वाळुंज (वय ७५, रा. शिनोली) यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
काय घडली घटना –
मिळालेल्या माहितीनुसार शनिवार, ४ एप्रिल रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास फिर्यादी वाळुंज हे गावातील भैरवनाथ मंदिराकडे जात असताना, दोन अज्ञात तरुण दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले. “मला जगदंबा देवीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी द्यायची आहे, तुम्ही माझ्यासोबत चला,” असे सांगून त्यांनी वाळुंज यांना विश्वासात घेतले आणि आपल्या दुचाकीवर बसवून जगदंबा देवी मंदिराच्या सभामंडपात नेले.
अशी केली फसवणूक –
मंदिरात गेल्यानंतर एका चोरट्याने स्वतःच्या गळ्यातील चैन काढून एका निळ्या रंगाच्या पिशवीत ठेवली. वाळुंज यांनाही त्यांच्या अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. वाळुंज यांनी आपली २ तोळे वजनाची सोन्याची चैन आणि अर्धा तोळा वजनाच्या दोन अंगठ्या पिशवीत ठेवल्या. दरम्यान, एका चोरट्याने त्यांना ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल मोजण्यासाठी दिले आणि “मी नारळ घेऊन येतो” असे सांगून तो साथीदारासह दुचाकीवरून फरार झाला. पिशवीत निघाले दगड आणि बिस्किटाचे पुडे बराच वेळ झाला तरी ते तरुण परत न आल्याने वाळुंज यांनी पिशवी उघडून पाहिली. पिशवीत सोन्याच्या दागिन्यांऐवजी छोटे दगड, पार्ले-जी बिस्किटाचे दोन पुडे, ५० आणि १० रुपयांची नोट आणि अगरबत्तीचा पुडा आढळून आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली.
पोलिस तपास –
घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. चोरटे काळ्या-निळसर रंगाच्या दुचाकीवरून आले होते. एकाने निळ्या रंगाचा शर्ट व हेल्मेट घातले होते, तर पाठीमागे बसलेल्या तरुणाने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रविंद्र सुरकुले या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
नागरिकांना आवाहन –
“अनोळखी व्यक्तींनी देवधर्म किंवा मदतीच्या नावाखाली संपर्क साधल्यास सावध राहावे. आपल्या अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितल्यास तो फसवणुकीचा प्रकार असू शकतो. अशा वेळी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.”


