1782234614371

आगीच्या तांडवात शेतमजुराचा संसार भस्मसात; ७ गाभण शेळ्यांचा होरपळून मृत्यू, रोख रक्कमसह ६ लाखांचे नुकसान

मंचर प्रतिनिधी – विश्वजित गवारी

आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील वनदेव वस्तीवर सोमवार (दि. ६) दुपारी आगीचे भीषण तांडव पाहायला मिळाले. या दुर्घटनेत शेतमजूर राहुल सीताराम खंडागळे यांचा संपूर्ण संसार डोळ्यादेखील खाक झाला असून, आगीत ७ गाभण शेळ्या व कर्डे दगावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काही क्षणात सर्व काही संपले

या बाबत मिळालेली माहिती अशी कि, दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केले. लाकडी कुडाची कोपी असल्याने आगीने क्षणार्धात पेट घेतला. घरात साठवून ठेवलेले धान्य, तांदळाचा साठा, भुईमुगाच्या शेंगांची पोती, शेतीसाठी लागणारा फवारणी पंप आणि संसारोपयोगी भांडीकुंडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. विशेष म्हणजे, मुलांची शालेय पुस्तकेही यात जळून खाक झाल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर झाला आहे.

मूक प्राण्यांचा आक्रोश अन् आर्थिक फटका

या आगीत कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा आधार असलेल्या ७ गाभण शेळ्या आणि त्यांची लहान कर्डे जिवंत होरपळून दगावली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घर बांधण्यासाठी किंवा इतर कामासाठी बँकेतून काढून आणलेली ६० हजार रुपयांची रोकडही आगीत भस्मसात झाली. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार, या दुर्घटनेत सुमारे ६ लाख रुपयांचे एकूण नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

घटनेच्या वेळी गावात यात्रा सुरू असल्याने बहुतेक ग्रामस्थ गावाकडे होते. वस्तीवर आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, वाऱ्याचा वेग आणि आगीची तीव्रता अधिक असल्याने सर्व काही जळून खाक झाले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

शासकीय मदतीची मागणी

कष्टाने उभा केलेला संसार क्षणात डोळ्यासमोर उधळला गेल्याने खंडागळे कुटुंब उघड्यावर आले आहे. महसूल विभागाने तातडीने पंचनामा पूर्ण केला असून, पीडित कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments