जाहिरात गवारी

पोलिसांकडून एकूण ३१.७८५ किलो गांजा हस्तगत, अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल !

प्रतिनिधी – विश्वजित गवारी
जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील आनंदनगर परिसरात एका उसाच्या शेतातून सुमारे १५ लाख ८९ हजार २५० रुपये किमतीचा ३१.७८५ किलो गांजा नारायणगाव पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

घटनाक्रम आणि कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास कांदळी येथील शेतकरी राहुल घाडगे हे आनंदनगर येथील असणाऱ्या त्यांच्या सामाईक शेतात उसाच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते. उसाच्या सरीतून जात असताना त्यांना प्लास्टिकच्या तीन संशयास्पद गोणी (निळ्या, पांढऱ्या आणि फिकट हिरव्या रंगाच्या) पडलेल्या दिसल्या. त्यांनी जवळ जाऊन एका गोणीची पाहणी केली असता, त्यात अंमली पदार्थासारखा उग्र वास असलेला हिरवट-काळसर रंगाचा ओलसर गांजा, बोंडे, बिया आणि पाने आढळून आली.

सदर शेतकऱ्याने तात्काळ ही माहिती त्यांचे बंधू जनार्दन घाडगे यांच्यामार्फत गावचे पोलिस पाटील अरुण भालेराव यांना दिली. पोलिस पाटलांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली आणि नारायणगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांना घटनेची माहिती दिली.

फॉरेन्सिक टीम आणि पंचांसमक्ष पंचनामा
माहिती मिळताच सपोनि प्रवीण संपांगे, पोलिस अंमलदार सोनकांबळे, तळपाडे, लोखंडे आणि ढेंबरे यांचे पथक तातडीने सरकारी वाहनाने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कायदेशीर कारवाईसाठी तात्काळ फॉरेन्सिक व्हॅन,शासकीय पंच, वजनकाटा धारक आणि फोटोग्राफर यांना पाचारण केले.फॉरेन्सिक टीमने गोणींमधील खाकी चिकट टेपने पॅक केलेली काही पाकिटे तपासली.

१५.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त
वजन काट्यावर मोजणी केली असता, गोणीसह एकूण ३१.७८५ किलो वजनाचा गांजा आढळून आला.एकूण १५,८९,२५० रुपयांचा हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यासोबतच गांजा पॅक करण्यासाठी वापरलेले रिकामे पाकीट, चिकट टेप व गोणी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिस शिपाई गोरक्ष हासे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ चे कलम ८(क) आणि २०(ब) (ii) (C) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पुणे ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे यांच्याकडे सोपवण्यात आला असून, उसाच्या शेतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा कोणी व कशासाठी आणून ठेवला, याचा शोध पोलिस घेत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Most Popular

Recent Comments