
प्रतिनिधी – विश्वजीत गवारी
लग्नासाठी मुलगी शोधत असलेल्या एका वृद्ध कुटुंबाला विश्वासात घेऊन, बनावट लग्नाचा घाट घालत ४० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे उघडकीस आला आहे. लग्न लावल्यानंतर अवघ्या काही तासांतच नवरी मुलीला घेऊन मध्यस्थी करणाऱ्या महिला फरार झाल्याने परिसरात खळबळबळ उडाली आहे.
याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात अमीना जमालउद्दीन सय्यद (रा. कोंढवा, पुणे) आणि नसीम शहाबुद्दीन मुंढे (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूर्यकांत गणपत काळे (वय ७०, रा. घोडेगाव) यांनी तक्रार दिली आहे.
जवळच्याच व्यक्तीने ऑनलाईन आणि रोख स्वरूपात उकळले पैसे
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सूर्यकांत काळे हे त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधत होते. याचाच गैरफायदा काळे यांच्या पत्नीची मैत्रीण असलेल्या नसीम मुंढे हिने घेतला. तिने पुण्यात राहणारी तिची बहीण अमीना सय्यद ही लग्नासाठी मुली पाहत असल्याचे सांगितले, मात्र मुलगी दाखवण्यासाठी सुरुवातीला ५,००० रुपयांची मागणी केली. काळे यांनी एका ग्राहक सेवा केंद्रातून अमीना हिच्या नंबरवर ५,००० रुपये ‘फोन पे द्वारे पाठवले, ज्यानंतर त्यांना व्हाट्सॲपवर एका मुलीचा फोटो पाठवण्यात आला.
मंदिरात थाटामाटात लग्न, अन् दुसऱ्याच दिवशी नवरी गायब!
मुलगी पसंत पडल्यानंतर दि. ८ मार्च २०२६ रोजी घोडेगाव येथील प्रसिद्ध हरिचंद्र मंदिरामध्ये हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे हा विवाह सोहळा पार पडला. परंतु, लग्न लावण्यापूर्वी आरोपी अमीना सय्यद हिने “या मुलीला कोणी नातेवाईक नसून मीच तिचा सांभाळ केला आहे, त्यामुळे लग्नासाठी मला आणखी ३५,००० रुपये द्यावे लागतील” अशी अट घातली. मुलाचे लग्न व्हावे या भावनेतून काळे यांनी ३५,००० रुपये रोख स्वरूपात दिले.
लग्न पार पडल्यानंतर सर्व जण घरी आले आणि आरोपी महिला देखील काळे यांच्या घरीच मुक्कामी थांबल्या. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळी कोणालाही काहीही न सांगता नवरी मुलगी आणि मध्यस्थी करणाऱ्या महिला घरातून पसार झाल्या.
पैसे मागताच उलट धमक्या
नवरी मुलगी अचानक गायब झाल्याने घाबरलेल्या काळे यांनी आरोपी महिलांना फोन केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जेव्हा काळे यांनी आपले ४०,००० रुपये परत मागितले, तेव्हा आरोपींनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला आणि “जर पुन्हा पैसे मागितले तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवू” अशी थेट धमकी दिली. अखेर फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर पीडित वृद्ध पित्याने घोडेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत न्याय मागितला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार घोडे करत आहेत.
सावधान राहा, फसवणूक टाळा!
आजकाल मुला-मुलींची लग्ने जमवताना मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे रॅकेट सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. अनोळखी व्यक्तींवर, मॅट्रिमोनी साईट्सवर किंवा केवळ फोटोंवर विश्वास ठेवून लाखो रुपयांचे व्यवहार करणे अत्यंत धोक्याचे ठरू शकते. विवाह ठरवण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची कौटुंबिक पार्श्वभूमी तसेच प्रत्यक्ष पडताळणी करणे गरजेचे आहे. लग्नासारख्या पवित्र बंधनाचा वापर करून पैशांची मागणी करणाऱ्या अशा टोळ्यांपासून सावध राहा. कोणतीही शंका आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा, कारण तुमची एक छोटीशी सतर्कता तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासापासून वाचवू शकते.
व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇


