
प्रतिनिधी -विश्वजित गवारी
पवित्र देवस्थानच्या परिसरात अनैतिक कृत्य करणाऱ्यांवर घोडेगाव पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. राजा हरिश्चंद्र मंदिरासमोरील बगीचा व ओढ्याजवळील मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे आणि सार्वजनिक ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:१० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. घोडेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना, त्यांना एका विश्वासू बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली होती. राजा हरिश्चंद्र मंदिरासमोरील बगीच्यात काही इसम चिलिमच्या सहाय्याने गांजा ओढत बसले आहेत, अशी ती माहिती होती.
माहिती मिळताच पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पंचांसह घटनास्थळी धाव घेतली आणि सापळा रचून छापा टाकला. यावेळी ५ जण चिलिम ओढताना पोलिसांना रंगेहात मिळून आले. पोलिसांनी या सर्वांना तात्काळ ताब्यात घेतले. आरोपींची वैद्यकीय तपासणी केली असता, ते अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कारवाई करण्यात आलेल्या संशयितांची नावे
१. मिलिंद दगडू काळे (वय ३४), २. स्वप्निल सूर्यकांत काळे (वय ३४), ३. बाळासाहेब आनंदराव काळे (वय ६९), ४. नवनाथ रामदास निसरड (वय ३३), ५. अक्षय राजेंद्र जंगम (वय २९) सर्व रा. घोडेगाव
तरी पोलिसांनी घटनास्थळावरून मातीची चिलिम, गांजा आणि इतर साहित्य जप्त करून पंचांसमक्ष नष्ट केले आहे. या पाचही जणांविरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात ‘गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५’ (NDPS Act) च्या कलम ८(क) आणि २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भाऊ गंगाराम कोरके करत आहेत.


