
आंबेगाव तालुक्यातील लोणी या गावातील घराशेजारी असणाऱ्या जाणवरांचे गोठ्याचे दरवाजाची कडी तोडून पहाटेच्या वेळेस अज्ञात चोरट्याने तीन बोकड व चार शेळ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे, याबाबत शेतकरी सावळेराम सोमाजी सिनलकर यांनी पारगाव कारखाना येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्वराज्य संवाद लोणी – प्रतिनिधी
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, लोणी, सावतमळा, ता.आंबेगाव, जि.पुणे. या गावामध्ये बेल्हा जेजुरी रस्त्यालगत फिर्यादीचे घर आहे तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेती बरोबरच जोड व्यवसाय म्हणुन फिर्यादी सिनलकर यांच्याकडे शेळ्या व गायी आहेत. या जनावरांसाठी सिनलकर यांनी घराशेजारीच शेडनेट मारून गोठा बांधला आहे. या गोठ्यामध्ये पाच गाई, अकरा शेळ्या अशी जनावरे होती.

मात्र दिनांक 17/06/2025 रोजी रात्री फिर्यादी व कुटुंबातील सर्व व्यक्ती झोपेले होते. सकाळी रोजच्या प्रमाणे घरातील सर्वजण झोपेतून उठल्यानंतर फिर्यादी हे जनावरांना चारा घालण्यासाठी गोठ्याकडे गेले असता, त्यांना गोठ्याचे दरवाज्याची कडी तुटलेली दिसली व दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यानंतर फिर्यादी यांनी घरातील सर्वांना बोलावून गोठ्याचे आत मध्ये जाऊन पहिले असता, गोठयामधील 3 बोकड व 4 शेळया त्या ठिकाणी दिसल्या नाहीत, त्यानंतर बाहेर आजूबाजूला देखील शोध घेतला असता बोकड व शेळ्या मिळाल्या नाहीत. त्यानंतर शेजारी असणाऱ्या दुध डेरी चे सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले असता पहाटेच्या दरम्यान चार चाकी गाडीची लाईट दिसून आली.

सदरची घटना ही दिनांक 17/06/2025 रोजी पहाटे सुमारे 01.00 वा ते 4.30 वा. चे दरम्यान घडल्याचे निदर्शनात आले तरी जनावरांचे गोठयाच्या दरवाजाची कडी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने उघडुन गोठयामधील 3 बोकड व 4 शेळया फिर्यादी सिनलकर यांचे संमती शिवाय चोरून नेल्याची घटना घडली आहे. सदर घडलेल्या घटनेचा पुढील तपास पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. गंधारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कालेकर हे करीत आहेत.