
मंचर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक २४/६/२०२५ रोजी दुपारी ४.३० वा ते ४.४५ वाजण्याचे सुमारास मौजे निघोटवाडी, ता. आंबेगाव जि पुणे या गावचे हद्दीत इसम नामे अक्षय सोपान काळे, रा. निघोटवाडी, मंचर ता आंबेगाव जि पुणे यांचे राहते घराचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने कशानेतरी कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून घरातील कपाट उघडून कपाटातील रोख रक्कम व एक टेबलावर ठेवलेला कुकर असा एकूण ८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरून करून नेलेला आहे. याबाबतची घरफोडी करून चोरी केल्याची तक्रार, अक्षय सोपान काळे यांनी मंचर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – मंचर
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वरील दाखल केलेल्या गुन्हयाचे तपासकामी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी घडलेल्या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत तपास पथकाची नेमणुक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन केले त्यानंतर तपास पथकातील पोलीस हवालदार शेखर भोईर, पोलीस अंमलदार योगेश रोडे, पोलीस अंमलदार अजित पवार हे अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना मंचर गावचे हद्दीत एक इसम हातात पिशवी घेवून संशयितरित्या उभा असलेला दिसला. त्यावेळी तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी संशयित इसमास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अक्षय यशवंत शिंगोटे वय २८ वर्षे रा. उबंज, ता. जुन्नर जि पुणे असे असे असल्याचे सांगितले.
त्यानंतर आरोपीला पोलिसांनी इतर माहिती विचारली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू देत होता. पोलिसांना समाधानकारक उत्तर दिली नाही. त्यामुळे पोलिसांना शिंगोटे याचेवर संशय आल्याने त्याचे हातातील पिशवीची पाहणी केली असता, पिशवीत एक कुकर मिळून आला. त्यानंतर फिर्यादी यांना सदर कुकर दाखवला व खात्री केली असता सदरचा कुकर फिर्यादी यांचाच असल्याचे फिर्यादी यांनी ओळखून व पाहून सांगितले आहे.
त्यामुळे संशयित इसम ताब्यात घेण्यात आलेला असून त्यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या इसमाकडून चोरून नेलेल्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
अटक आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली असून पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान पोलिसांचे तपासात आरोपीवर ओतूर, आळेफाटा, खेड पोलीस स्टेशनचे हद्दीत घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन झाले आहे.
दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक गणपत डावखर हे करीत आहेत.सदरची कामगिरी हि मा. पोलीस अधिक्षक श्री. संदिपसिंग गिल सो, मा अपर पोलीस अधिक्षक श्री रमेश चोपडे, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल मांडवे साो, मा. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार डावखर, पोलीस हवालदार शेखर भोईर, पोलीस अंमलदार योगेश रोडे, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार अविनाश दळवी यांनी केली आहे.