
वडगाव काशिंबेग या गावातील शेटे मळ्यामधील राहणारे माजी सरपंच सुखदेव नाना शेटे यांचे घरासमोरील ओट्यावरून जनावरांच्या गोठ्यात जाताना तीन बिबटे चक्क सीसीटीव्हीत कैद झाले असून गोठ्यामध्ये असणाऱ्या वासराला स्वतःचे भक्ष बनवत असताना गोठ्यातच झोपलेल्या शेतकऱ्याला जाग आल्यामुळे वासरू थोडक्यातच बचावले आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – दिपाली खिरड
आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा वावर आता गावा गावातील गल्ली बोळात दिसू लागला असल्याने गावांमध्ये बिबट्याचे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. अशातच दिनांक २३/०७/२०२५ रोजी रात्री सव्वा एकच्या सुमारास ३ बिबटे एकापाठोपाठ घरासमोरील ओट्यावरून जनावरांच्या गोठ्यात जात असताना सीसीटीव्ही मध्ये दिसले आहे. ही घटना वडगाव काशिंबेग येथील शेटेमळ्यात राहणारे माजी सरपंच सुखदेव नाना शेटे यांच्या घरासमोरील ओट्यावर व जनावरांचे गोठ्यामध्ये घडली असल्याचे सीसी टीव्हीत दिसले आहे.

पाणीसाठा मुबलक असल्यामुळे त्या ठिकाणी शेती बागायती असतात, तर बिबट्याला पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते परंतु खाण्यासाठी त्यांना भक्ष दिसत नसल्यामुळे बिबटे हे आपले भक्ष शोधण्यासाठी मानवी वस्तीकडे, जनावरांचे गोठ्याकडे वळतात तरी हे तीन बिबटे आता मानवी वस्तीवर वावर करू लागले असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे.

दरम्यान त्याठिकाणी घराला लागूनच गोठा असल्याने गोठ्यामध्ये अनेक जणावरे होती परंतु एक बिबट्या चोर पावलाने येऊन गोठ्यामधील वासराला आपले भक्ष बनवत असतानाच त्याची हालचाल व त्या ठिकाणी असणाऱ्या इतर जनावरांची हालचाल शेजारी झोपलेल्या शेतकऱ्याला जाणवल्याने व आवाज ऐकू आल्याने त्याने झोपेतून उठून अंगावरील पांघरून घेण्याची चादर झटकली आणि जवळ असणाऱ्या काठीने बिबट्याला हुसकावून लावले आहे त्यामुळे वासराचा व त्याठिकाणी असणाऱ्या जाणावरांचा व स्व:ताचा जीव शेतकऱ्याने वाचवला आहे.
दरम्यान आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर आता कधीही आणि कुठेही मानवी वस्तीवर जास्त दिसून येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.

वडगाव काशिंबेग मधील शेटे मळ्यामध्ये तीन बिबटे एकत्रित दिसल्यामुळे वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी जनतेतून होत आहे.