
श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग वाळुंजवाडी या गावचे हद्दीमध्ये बिबट्याचा वावर वाढला असून मंचर भीमाशंकर रोड लगत भैय्येमळ्याच्या व रस्त्याच्यालगत राहणारे अक्षय अरुण निघोट यांच्या घरासमोर दोन बिबट्यांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कैद.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – दिपाली खिरड
श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी शेटेमळा या ठिकाणी तीन बिबटे एकत्रात मुक्त संचार करताना सीसी टीव्हीत कैद झाले असल्याचे वृत्त स्वराज्य संवाद या वृत्तपत्र व वृत्त वाहिनीने दाखविले होते, त्यातच आज मंचर भीमाशंकर रोड लगत वडगाव काशिंबेग व वाळुंजवाडी गावच्या हद्दीत भैय्येमळ्या लगत अक्षय अरुण निघोट यांचे घरापुढील ओट्यासमोर आजू बाजूच्या परिसरात आज दिनांक 25/7/2025 रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास दोन बिबट्यांचा एकत्रित वावर असल्याचे कॅमेरात कैद झाले असून घराचे राखणदार करणारे कुत्रे देखिल बिबट्याने नेले असल्याचे दिसून आले.

अक्षय अरुण निघोट हे वाळुंजवाडी गावच्या हद्दीत भैय्येमळ्यालगत कुटुंबासह राहत असून त्यांचे घरात लहान मुले देखील आहेत. घरामध्ये बिबट्याच्या व चोरांच्या भीतीपोटी दोन कुत्रे देखिल पाळले आहेत. निघोट कुटुंबाने सांगितलेनुसार दर चार-पाच दिवसातून रात्री दिवसा, दुपारी, सायंकाळी केंव्हाही बिबट्याचे दर्शन या कुटुंबाला परिसरात पाहवयास मिळते. सदर ठिकाणी वीट भट्टी असून त्यठिकाणी कुटुंबासह कामगार देखील आहेत, तसेच एक लहान वस्ती देखील आहे. त्या ठिकाणी ओढा तसेच उसाचे क्षेत्र देखील आहे.
तर निघोट कुटुंब हे रात्री झोपलेले असताना पहाटे सव्वातीनच्या सुमारास पाळीव कुत्रे मोठ मोठ्याने भुंकू लागल्याने अक्षय निघोट यांच्या आई सीता निघोट यांना जाग आली आणि त्यांनी अक्षय यांना उठवले कुत्रे का भूकतात हे पाहण्यासाठी अक्षय निघोट यांनी घराच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता त्यामध्ये एकत्रित दोन बिबटे सोबत फिरत असल्याचे दिसून आले. अक्षय निघोट हे बाहेर येणार तितक्यातच एका बिबट्याने त्यांचे एका कुत्र्यावर झडप मारली आणि त्याला आपले भक्ष बनवून ओढ्याच्या कडेला पळून गेला. दुसरा बिबट्या देखील त्याच्या मागे पळून गेला.

एकंदरीत सर्व घटना पाहता आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग आणि वाळुंजवाडी या गावांच्या हद्दीमध्ये आता बिबट्या एक एकट्याने न दिसता एकत्रित टोळक्याप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरात मानवी वस्तीत मुक्त संचार करताना दिसत आहेत.
दरम्यान मानवी वस्तीत एकत्रित बिबटे दिसत असल्याने गावातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. वनविभागाने तात्काळ निघोट यांचे घराचे परिसरात ओढ्यालगत पिंजरा लावण्याची मागणी या कुटुंबाने केली आहे.