
आज दि. 29/07/2025 रोजी जुन्नर वरून येणाऱ्या फुल स्पीड पिकअप गाडी नंबर MH 14 KA 0679 या गाडीने पठाण क्रेशर समोर जुन्नर नारायणगाव रोडवर कुरण फाट्याजवळ नारायणगाव वरून दुचाकीवर चाललेले पती-पत्नीला उडवले असून त्यामध्ये पतीचा मृत्यू झाला आहे.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – नारायणगाव
याबाबत मिळालेली माहिती अशी की अमजत पिरमहंमद पठाण वय वर्षे 50 आणि त्यांची पत्नी रुकसाना अमजद पठाण राहणार बादशहा तलाव तालुका जुन्नर यांचा मुलगा मंचर या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असून त्याचे ऑपरेशन झाले होते, मुलासाठी व त्याच्या सोबत राहणारे व्यक्तीसाठी घरातून कपडे व डबा आणण्यासाठी मंचर येथून घरी बादशाह तलाव या ठिकाणी जात असताना, जुन्नर बाजू कडून येणारी पिकअप गाडी नंबर MH 14 KA 0679 ही पिकअप त्याच्या समोरील जुन्नर वरून नारायणगाव कडे जात असणाऱ्या दुसऱ्या गाडीला चुकीच्या दिशेने जास्त स्पीडमध्ये ओव्हरटेक करत असताना, पठाण क्रेशर समोर जुन्नर नारायणगाव रोडवर कुरण फाट्याजवळ MH 14 KA 0679 या पिकअप गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील अमजत पिरमहंमद पठाण यांना डोक्याला जोरदार मार लागून जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांच्या पत्नी रुकसाना अमजद पठाण यांना हाता पायाला मार लागला असून जवळील असणारे खैरे हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना ऍडमिट केले आहे.

मात्र अपघात झाल्यानंतर पिकअप ड्राइवर हा गाडी घेऊन पळून चालला होता तसेच पिकअप ड्रायव्हर हा दारू पिलेला होता, सदर पिकअप ही एकलहरे हद्दीतील असल्याचे घटनास्थळी असणारे स्थानिक लोक सांगत आहेत, तर पिकअप ड्रायव्हरला त्या ठिकाणी असणाऱ्या ॲम्बुलन्सने पाठलाग करून पकडले असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान पठाण कुटुंब हे अतिशय गरीब होते मुलाच्या ऑपरेशन साठी लोकांनी व सहकाऱ्यांनी निधी जमा करून पठाण यांचे मुलाचे ऑपरेशन मंचर येथील एका हॉस्पिटलमध्ये केले असल्याचे सांगण्यात येत आहे तर अमजत पिरमहंमद पठाण हे गाडीवर ड्रायव्हरचे काम करत होते असे सांगण्यात येत आहे.

तसेच सदर पिकअप मध्ये गाडीत जुन्नर मधून बसलेले एक पॅसेंजर होते, सदर पॅसेंजर कडून माहिती मिळाली असता सदर पिकअप ड्रायव्हर हा सदरची पिकअप ही नागमोडी सारखे फुल स्पीड मध्ये चालवत, पिकअप समोरील अनेक गाड्या ओव्हरटेक करत असल्याचे पिकअप मध्ये मागे बसलेले घटना डोळ्यांनी पाहिलेले प्रथमदर्शी पॅसेंजर महेश प्रदीप तपासे हे सांगत आहेत. सदर अपघातास कारणीभूत पिकअप ड्रायव्हर असल्याचे सांगण्यात येत आहे