
श्रावण महिना चालू झाला असल्याने बारा ज्योतिर्लिंगापैकी पुणे जिल्ह्यातील डोंगर दऱ्यामध्ये वसलेले श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी विविध क्षेत्रातील अनेक ठिकाणाहून परराज्यातून भाविक भक्त येत असतात. त्यातच देवदर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांचे सोबत, गळ्यात असणारे मौल्यवान वस्तूंवर चोरटे डल्ला मारत असल्याचे निदर्शनात आले आहे, अशा तक्रारी पोलीस स्टेशन या ठिकाणी येत असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले जात असून सदर चोरट्यांचा तपास पोलीस करत असतात.
स्वराज्य संवाद प्रतिनिधी – श्री क्षेत्र भीमाशंकर
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी आलेले निलेश तानाजी पारखी या भाविकाची 5.700 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरट्याने चोरून नेल्याची घटना दिनांक 20 जुलै रोजी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान चार नंबर पार्किंग येथे घडली होती. याबाबतची तक्रार देऊन घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर दिनांक 25/07/2025 रोजी चाकण पोलीस स्टेशन येथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकातील सह पोलीस निरीक्षक प्रसंन्न ज-हाड, पोलीस हवालदार कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल सुर्यवंशी, लोखंडे, भागवत यांचे पथकाने श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान येथे पेट्रोलिंग (गस्त) करत असताना, त्या दरम्यान एक्टिवा मोटार सायकल नं. एम एच 12 क्यु झेड 914 हिचे वरील दोन इसम नामे 1) मयुर दत्तात्रय जाधव वय 30 वर्षे रा. करंजविहीरे ता. खेड जि. पुणे, 2) आकाश बाळु कडु वय 30 रा. अहिरे गाव, वांजळेवाडी हनुमान मंदिरा जवळ, ता. हवेली जि. पुणे त्यांच्या चोरीच्या उद्देशाने दिसणाऱ्या हालचाली पाहून त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी करुन घोडेगाव पो. स्टे. येथे गुरनं 128/2025 बी एन एस कलम 304(2) प्रमाणे दाखल गुन्हयाची चौकशी केलेली आहे. आणि सदर आरोपींनी गुन्हयातील चोरी केलेले एक सोन्याची 5.700 ग्रॅम वजनाची चैन व चोरीचा गुन्हा करत असताना वापरलेली एक्टिवा मोटार सायकल असा मुददेमाल या दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आला असून सदर दोन्ही आरोपींना घोडेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून अटक करण्यात आले आहे.
दरम्यान श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी होत असून, देवदर्शनाला येताना कोणीही मौल्यवान वस्तू सोबत आणू नये, तसेच लहान मुलांकडे लक्ष द्यावे, त्या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने कोणी हालचाली करत असेल किंवा असे काही निदर्शनास आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी अथवा त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सागर पवार यांनी केले आहे.