घोडेगाव प्रतिनिधी – सुरंजन काळे
घोडेगाव येथील प्राचीन असणारे ग्रामदैवत श्री राजा हरिश्चंद्र महादेव संस्थानाला “क” वर्ग तीर्थक्षेत्रचा दर्जा प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे यांनी दिली. घोडेगाव नगरी तसेच पंचक्रोशीचे श्रध्दास्थान असणारे श्री राजा हरिश्चंद्र हे महादेवाचे पुरातन मंदिर आहे. यामध्ये प्रभू रामचंद्रांचे पूर्वज असलेले राजा हरिश्चंद्राची समाधी मंदिर आहे.मंदिरात अतिशय पुरातन शिवलिंग असून त्याची पूजा नित्यनेमाने केली जाते. संस्थेला क दर्जा प्राप्त होणे साठी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी सतत १२ वर्षे पाठपुरावा करून तमाम शिवभक्तांची स्वप्नपूर्ती केली असल्याची भावना आता घोडेगाव तसेच पंचक्रोशीतून व्यक्त केली जात आहे.
तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बैठकीत “क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व संस्थेचे कोषाअध्यक्ष राजेश काळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला यासोबतच सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील व मा. खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शिफारस केल्याने “क” दर्जा प्राप्त झाला असून यामुळे संस्थेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असून संस्थेची प्रलंबित कामे मार्गी लागणार आहे असे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काळे यांनी सांगितले आहे.