प्रतिनिधि – सुरंजन काळे
घोडेगाव (ता आंबेगाव) येथील श्री हरिश्चंद्र महादेव यात्रा उत्सव आजपासून सुरू झाला आहे. सकाळी अभिषेक झाल्यानंतर नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.श्री क्षेत्र भीमाशंकरबरोबर भाविक येथील हरिश्चंद्र महादेवाचे दर्शन घेत असतात. यावर्षी अधिक श्रावण व चालू असलेला श्रावण महिना या दरम्यान लाखाहून अधिक भाविकांनी हरिश्चंद्र महादेवाचे दर्शन घेतले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, जगदगुरू संत तुकाराम, राजमाता जिजाऊ आदींनी श्री हरिश्चंद्र महादेवाचे दर्शन घेतले आहे. संत तुकाराम महाराजांनी श्रावणी तिसऱ्या सोमवारी यात्रा उत्सवाची परंपरा सुरू केली आहे, असे देवस्थान अध्यक्ष प्रशांत काळे यांनी सांगितले.
घोडगंगेच्या पवित्र तटावर वसलेल्या घोडेगाव नगरीत हरिश्चंद्र महादेव मंदिरात तीन शिवलिंगे असून ब्रम्हेश्वर, हरिश्चंद्र (हरिहर), काशीविश्वेश्वर या नावाने प्रसिद्ध आहेत. सृष्टीतील ब्रम्हा-विष्णू-महेश यांची लिंग स्वरूप प्रतिके आहेत. मुख्य शिवलिंगाखाली साडेतीन फुटावर स्वयंभू शिवलिंग असून हेच श्री राजा हरिश्चंद्राचे समाधीस्थळ आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी पवित्र शिव लिंगावरील साळुंका विधीवत काढल्यानंतरच भाविकांना दर्शन घेता येते. स्वयंभू लिंग अखंड पाण्यात असल्याने त्यास जललिंग अशीही उपाधी लावतात. अनेक संत महंतांनी या ठिकाणी तपश्चर्या करून पाषाणगुहारूपी मंदिरात पूजेसाठी अखंड जलस्रोत निर्माण केला. शेकडोवर्ष झाली तरीही हा जलस्रोत आटला नाही.श्री हरिश्चंद्र महादेव मंदिराची बांधणी स्थापत्य कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. प्रवेश व्दारावर श्री गणेशाची प्राचीन मूर्ती आहे. श्री राजा हरिश्चंद्राच्या मागे लागलेल्या विश्वमित्राचे मंदिर मुख्य मंदिराच्या मागे असून देवालयाच्या शिखरावर शिवपार्वती, गणेश आदींच्या सुबक मूर्ती आहेत. मुख्य मंदिराशेजारी आदिशक्ती महाकालीचे मंदिर आहे. कुठेही न दिसणारी ज्ञानदानाच्या भाव मुद्रेतील श्री दत्तात्रयांची मूर्ती येथे पहावयास मिळते.
येणाऱ्या भक्त, भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी देवस्थान विश्वस्त, घोडेगाव, पंचक्रोशीतील ग्रामस्थ प्रयत्न करत असल्याचे देवस्थान अध्यक्ष प्रशांत काळे व विश्वस्त कुंदन काळे यांनी सांगितले. सायंकाळी मानाचा हाराची विधीवत पारंपारिक वाद्यात मिरवणूक काढण्यात काढली. उद्या कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. असल्याची माहिती नियजोक श्री कुंदन काळे यांनी माहिती दिली खेळण्याची दुकाने व खाण्याची दुकाने घोडेगावात सजली आहे.