प्रतिनिधी – सुरंजन काळे
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे भक्तिमय वातावरणात पार पडला. घोडेगाव येथून तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जुन्नरकडे प्रस्थान झाले. या वेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. घोडेगाव येथून ऋषिपंचमीच्या दिवशी तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे प्रस्थान झाले. हा पलंग एक दिवस निमदरी येथे मुक्कामी राहणार आहे. त्यानंतर जुन्नरला त्याचे प्रस्थान होणार असल्याची माहिती शनैश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष रवीद्रं कर्पे यांनी दिली. तुळजाभवानी मातेचा पलंग घोडेगाव येथील श्री शनी मंदिरात तयार केला असून, तो मंदिरात दर्शनाला ठेवण्यात आला होता. पलंग येथून तुळजापूरला पाठवण्याची परंपरा यादव काळापासूनची आहे. ती जपण्याचे कार्य व पलंगाच्या लाकडावर कोरीवकाम करण्याचे, पलंगाचे सुट्टे भाग जोडण्याचे ठाकूर घराण्याचे वारस घोडेगाव येथील भागवत कुटुंब करीत आहे. पलंगाची बांधणी करण्याचा मान घोडेगावच्या तिळवण तेली समाजाला आहे. पलंग तुळजापूरला नेण्याचे मानकरी अहमदनगर येथील पलंगे परिवाराकडे आहे. तुळजाभवानी मातेच्या पलंगाची घोडेगाव येथील शनी मंदिरापासून चावडी चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. महाआरती झाल्यानंतर पलंगाचे प्रस्थान झाले. याप्रसंगी शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अजित चिलेकर, सचिव निखिल कर्डिले, वासुशेठ कर्पे, नीलेश चिलेकर, सुनील मेहेर, संतोष मेहेर ,विनायक कर्पे, समीर कर्पे ,आदींसह घोडेगाव परिसरातील भाविक-भक्त, तिळवण तेली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.