प्रतिनिधि – किशोर ठोसर
दि. ०८ फेब्रुवारी : अवसरी बुद्रुक येथील “जय गणेश प्रतिष्ठान” आयोजित तसेच “लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड” व “सोशल हेल्प अँड हेल्थ फाउंडेशन- टाकेवाडी” यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर सोमवार दिनांक, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत श्री गणेश मंदिर वरचा हिंगे मळा अवसरी बुद्रुक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे.
या शिबिरात अस्थिरोग तपासणी, हृदयरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी, कर्करोग तपासणी, सर्वसाधारण तपासणी, मोफत सल्ला व मार्गदर्शन त्याचबरोबर सर्व प्रकारच्या व्याधीवर आयुर्वेद तपासणी ही देखील विनामूल्य उपलब्ध होणार आहे. यासोबतच गरजूंना चिकित्सेबरोबरच निवडक औषधे मोफत देण्यात येतील.
आंबेगाव तालुक्यातील झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या लक्षात घेता शासकीय वैद्यकीय सुविधां वरती येणारा ताण हा सर्वज्ञात आहे. अशावेळी या सेवाभावी संस्था अशाप्रकारची शिबिरे आयोजित करून गरजूंना आरोग्य सेवा देत असतात आणि म्हणूनच अशा प्रकारच्या आरोग्य तपासणी शिबिरातून गोरगरिब तसेच सर्वसामान्य जनतेला नक्किच फायदा होतो. ग्रामीण भागात उपचारांची गरज असणाऱ्या नागरिकांनी या शिबिराला उपस्थिती लावावी असे आवाहन “सोशल हेल्प अँड हेल्थ” या समाजसेवी संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश चिखले यांनी केले आहे.