कडाचीवाडी (ता. खेड) जवळील ठाकरवाडीच्या शाळेत गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी तसेच त्यांच्यातील अंगभूत कौशल्यांचा विकास होण्यासाठी शाळेत प्रथमच ‘नवचैतन्य’ व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेत तिसरे पूष्प गुंफताना आदर्श शिक्षिका व लेखिका सुवर्णा धादवड यांनी ‘विद्यार्थी दशेतील आनंदी जगणे’ याविषयी अनमोल मार्गदर्शन केले.
कौटुंबिक वातावरणातून मूल शाळेत आल्यानंतर शिक्षकांकडून ते अनेक गोष्टी शिकत असते. वाचन लेखनाबरोबरच बोलावे कसे , वागावे कसे , रहावे कसे, याचे संस्कार पालक व शिक्षक नियमित करत असतात. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी चांगले गुण आत्मसात करावेत व दोष कमी करावेत , म्हणजे सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व घडते आणि आपले जीवन आनंदी बनते . शाळेतील शिस्त ,उपक्रम, खेळ, स्पर्धा विविध कार्यक्रम यातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक , शारीरीक , भावनिक व सामाजिक विकास होत असतो. हा विकास होत असताना शिक्षकांप्रमाणेच पालकांचेही संस्कार तितकेच महत्वाचे असतात . म्हणूनच मुलांसमोर पालकांचे वर्तन आदर्शवतच असायला हवे .असे प्रतिपादन सुवर्णा धादवड यांनी केले. विद्यार्थ्यांसोबत गप्पा , गोष्टी , गाणी यांद्वारे संवाद साधत सुवर्णा धादवड यांनी विद्यार्थ्यांना बोलते केले. शाळा आहे आमची किती छान , आम्ही रोज शाळेला जाणार ‘ या कृतीयुक्त गीताच्या बहारदार गायनाने विद्यार्थ्यांसहीत पालकही मंत्रमुगध झाले होते. यावेळी शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सुवर्णा धादवड यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . यावेळी सुवर्णा धादवड यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रियांका ओव्हाळ होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिपक धनवटे होते. या कार्यक्रमास कडाचीवाडी शाळेतील शिक्षक माने सर, पल्लवी पवार तसेच विद्यार्थी, पालक व ग्रामस्त बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपक्रमशील शिक्षक बाळासाहेब पारधी यांनी तर आभार मुख्याध्यापक सुजित हासे यांनी मानले.